आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Equipped Control Room For Police Commissionerate Office

नियोजन सिंहस्थाचे: पोलिस आयुक्तालयात सुसज्ज कंट्रोल रूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थातील सुरक्षाविषयक नियोजनाच्या अनुषंगाने विविध यंत्रणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयात अद्ययावत कंट्रोल रूम बनविण्यात आला आहे. कुंभमेळ्यात सुरक्षेचा मुद्दा अतिमहत्त्वाचा असल्याने शहरात बसविण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह वायरलेस पब्लिक अॅड्रेस सिस्टिमवरदेखील या कंट्रोल रूमद्वारे शहर पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे.
सिंहस्थ नियोजनात पोलिस यंत्रणेची खरी कसोटी लागणार आहे. कुंभमेळ्यात सर्वच घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ३४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या काळात शहरात येणाऱ्या लाखो भाविकांसह हजारो साधू-महंतांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहणार आहे.
सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त असला, तरी सूक्ष्म हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सर्व चित्रीकरण पोलिस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या कमांड सेंटरमध्ये जतन करण्यात येणार आहे. एकाच वेळी मोठ्या आकाराच्या १२ स्क्रीनवर सर्व चित्रीकरण, तसेच एका संचामध्ये सहा कॅमेऱ्यांचे चित्रीकरण स्पष्टपणे पाहता येणार आहे.
पोलिस प्रशासनातर्फे सर्व चित्रीकरणावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिनतारी संदेश यंत्रणेचा या विभागास सर्वाधिक उपयोग होणार आहे. संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवर संदेश पाठवला जाऊन संबंधित ठिकाणावर अवघ्या पाच मिनिटांत हजर असलेल्या अधिकाऱ्याला संदेश प्राप्त होऊन कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना मार्गदर्शनासाठी हजार ६२४ ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे खबरदारीच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जाणार आहेत.
विभागांनुसार नियोजन
मुख्य सेंटरसह नाशिकरोड, साधुग्राम, रामकुंड आणि रस्ते वाहतूक अशा प्रकारे सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणावरदेखील मुख्य कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
चाचणीद्वारे आढावा
- सीसीटीव्हींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मुख्यालयात कंट्रोल रूममध्ये चाचणी घेण्यात आली असून, सर्व बारीकसारीक हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद होणार आहेत.
एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त