आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईएसआय रुग्णालयात शिपाई देतोय औषधे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले ईएसआय रुग्णालयच सध्या ‘आजारी’ असल्याची स्थिती दिसून येत आहे. परिचारिकांअभावी रुग्णालयाचा वॉर्ड बंद करण्याची वेळ आल्याचे डॉक्टरच बोलू लागले आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे रुग्णालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेला कर्मचारीच फार्मासिस्टची भूमिका निभावत असून, औषधांचादेखील तुटवडा निर्माण झालेला आहे.

औद्योगिक वसाहतीत काम करणार्‍या कामगारांची व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी प्रामुख्याने ईएसआय रुग्णालय प्रशासनाची आहे. त्यासाठी कामगारांच्या वेतनातून दरमहा रक्कम कपात केली जाते. यातून ईएसआय प्रशासनाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मात्र, असे असतानाही रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांना कोणत्याही प्रकारची अत्याधुनिक सेवा पुरविली जात नाही. रुग्णालयात आधुनिक यंत्रसामग्री नसल्याने प्रशासनाने शहरातील नामवंत रुग्णालयांशी करार केलेला आहे. मात्र, त्यांनाही वेळेवर निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने तेथे रुग्ण दाखल करून घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

औषधांचा कायमच तुटवडा
ईएसआय रुग्णालयातील औषधांचा तुटवडा कायमच आहे. प्रशासन व कर्मचार्‍यांचा संवाद नसल्याने सर्वत्र मनर्मजीपणाने काम सुरू असल्याचे जाणवते. काही वेळा मुख्य औषध भांडारात औषधे उपलब्ध असतानाही फार्मासिस्टकडून मागणी केली जात नसल्याने रुग्णांना औषधांपासून वंचित राहावे लागत आहे. हृदयरोग व मेंदूवरील औषधे क्वचितच उपलब्ध असतात. आम्ही औषधांची मागणी करतो. मात्र, कंपनीकडूनच माल येत नसल्याचे औषधनिर्माता डी. ई. मोरणकर यांनी सांगितले.

परिचारिकांची कमतरता
नियमाप्रमाणे पाच रुग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी एक परिचारिकेवर सोपावली जाते. मात्र, ईएसआय रुग्णालयात 50 रुग्णांची जबाबदारी एका परिचारिकेला सांभाळावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या सेवेची अपेक्षा ठेवणे चुकीचे असले, तरी प्रशासन मात्र कोणत्याही पद्धतीची हालचाल करीत नसल्याने परिचारिकांमध्येही संतापाची लाट पसरली आहे. 100 खाटांच्या या रुग्णालयाचा कारभार केवळ 20 परिचारिकांच्या भरवशावर सुरू आहे.