आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ईएसआय’मध्ये फार्मासिस्टच देणार औषधे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ईएसआय रुग्णालयात शिपायाकडून औषधांचे वाटप केले जात असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी शहर कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण चव्हाण यांना धारेवर धरत जाब विचारला. प्रारंभी या संपूर्ण प्रकरणात प्रशासकीय बाजू घेणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सोमवारपासून औषध निर्मात्याकडूनच औषधांचे वाटप करण्याचे आश्वासन दिले.

ईएसआय रुग्णालयात शिपायाकडून औषध वाटप केले जात असल्याचे सचित्र वृत्त शनिवारी प्रसिध्द झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शहर कॉँग्रेसचे सरचिटणीस दीपक राव, सातपूर ब्लॉक कॉँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत निर्वाण, सोना गांगुर्डे, प्रकाश शादरूल, संजय गांगुर्डे, कैलास पवार आदींच्या शिष्टमंडळाने सकाळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण चव्हाण यांना घेराव घालून जाब विचारला. प्रारंभी कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने शिपायामार्फत औषध वाटप केले जात असल्याची कबुलीच अधीक्षकांनी दिली. मात्र, यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, शिपायाच्या हस्ते औषध वाटप करण्यास तुम्ही कसे प्रोत्साहन देतात, अशा प्रश्नांचा भडिमार डॉ. चव्हाण यांच्यावर केल्यानंतर त्यांनी सोमवारपासून दोन फार्मासिस्ट्सची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगून यापुढे फार्मासिस्टकडूनच औषधांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

सिस्टर इन्चार्जने मांडली व्यथा
रुग्णालयात सुरू असलेल्या सावळ्या गोंधळावर खुद्द सिस्टर इन्चार्ज असलेल्या मीरा माकरे यांनीच प्रकाशझोत टाकला. परिचारिकांची संख्या कमी असल्याने आम्हालाच काम करावे लागत आहे. आम्हाला सुट्या मिळणेदेखील दुरापास्त झाले असून, अनेक तक्रारी करूनही फायदा होत नसल्याची व्यथाच त्यांनी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळापुढे मांडली.

पाठपुरावा करणार
शिपायाने रुग्णांना औषधे देणे ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याचा जाब वैद्यकीय अधीक्षकांना विचारला असता त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी सोमवारपासून फार्मासिस्टकडूनच औषध वाटप होणार असल्याचे सांगितले असून, यापुढे आम्ही पक्षाच्या माध्यमातून दर्जेदार सेवेबाबत नेहमीच पाठपुरावा करणार आहोत. दीपक राव, सरचिटणीस, शहर कॉँग्रेस.