आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्ट कामगारांचा दिंडोरी तहसीलवर मोर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी - तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीतील एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या कामगारांनी वेतनवाढीसाठी 70 दिवसांपासून संप पुकारला असूनही व्यवस्थापनाने त्यावर कुठलीही भूमिका न घेतल्याने किसान सभा सीटूतर्फे दिंडोरी मार्केट यार्ड ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दीड तास धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राज्य अध्यक्ष माजी आमदार जे. पी. गावित, सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, किसन गुजर यांनी केले. आंदोलनात कंपनीतील सर्व कामगारांचे कुटुंब तसेच किसान सभेचे सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजीने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. कामगारांवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी तालुक्यातील शेतक-यांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला. कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या मागण्या मान्य करून संप मिटवावा, अशी मागणी सीटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी केली. यावेळी पोलिस निरीक्षक कल्याणराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.दरम्यान आमदार धनराज महाले यांनी एव्हरेस्ट कामगार संपप्रश्नी सकारात्मक मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात युनियनचे कमिटी मेंबर रमेश चौधरी, दीपक पाटील, नितीन काळे, केशव मातेरे, नितीन पाटील, नंदू मंडलिक आदीसह सर्व कामगार सहभागी झाले.
कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावू - युनियनने जे निवेदन दिले ते वरिष्ठांना कळवू. युनियन प्रतिनिधी, व्यवस्थापन व कामगार आयुक्त यांची बैठक घेऊन कामगारांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करणार. - उमेश बिरारी, तहसीलदार, दिंडोरी
कामगार अन्याय सहन करणार नाहीत - कामगार व शेतक-यांवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही. येथील शेतक-यांनी आपल्या जमिनी विकून आपल्या मुलांना कामगार म्हणून कंपनीत कामाला लावले. कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी श्रीमंत झाले. मात्र, कामगारांचा विचार कधीही केला जात नाही. 22 जानेवारीपर्यंत संप मिटला नाही तर अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल. - जे. पी. गावित, माजी आमदार