आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एव्हरेस्ट कामगारांचा संप 211व्या दिवशीही सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी: तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीतील एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी वेतनवाढीच्या मुद्दय़ावर कायदेशीररीत्या पुकारलेल्या संपाला 211 दिवस, तर कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यातील बैठकीत चर्चा फिस्कटल्याने कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाला 51 दिवस पूर्ण झाले आहेत.
बैठका ठरल्या फेल
संप व उपोषणामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेनेचे आमदार धनराज महाले, नाशिक वर्क्‍स युनियनचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, माजी आमदार जे. पी. गावित, निफाडचे आमदार अनिल कदम, तहसीलदार उमेश बिरारी यांच्यासह सर्वपक्षीयांनी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्वमान्य तोडगा निघाला नाही.
कुटुंब वार्‍यावर
कामगारांच्या वेतनवाढीचा करार 31 मार्च 2012 रोजी संपुष्टात आल्याने नवीन करारासाठी कामगारांनी कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली. मात्र, कंपनीने त्यास अनुकूलता न दर्शवल्याने कामगारांनी वेतनवाढीसाठी मोर्चा, निदर्शने, धरणे आंदोलन केली. त्यामुळे मागणी पूर्णत्वास न गेल्याने 8 नोव्हेंबर 2011 रोजी कंपनी व्यवस्थापनाला नोटीस बजावत संप पुकारला आहे. त्यामुळे कामगारांचे वेतन थांबल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कंपनीचे उत्पादन सुरूच
कंपनीच्या कायमस्वरूपी कामगारांनी संप पुकारल्यानंतर कंपनीने तत्काळ कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करून उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे कामगारांच्या संपाचा कंपनीवर कोणत्याही प्रकारे परिणाम झाला नाही.
चर्चेला तयार
निलंबित कामगारांना कामगार न्यायालयाने आदेश दिल्याशिवाय पुन्हा कामावर घेता येत नाही. कंपनीने थोड्या फार प्रमाणात उत्पादनाचे काम सुरू केले आहे. तरी कामगारांशी वेतनप्रश्नी चर्चा करण्यास तयार आहोत. के. के. रमेशन, व्यवस्थापक, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, लखमापूर
सहनशक्तीचा अंत पाहू नये
वेतनवाढीचा मुद्दा येताच कंपनी कामगारांना बडतर्फ करत आली आहे. कंपनीच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी लढा देत असून, व्यवस्थापनाने कामगारांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. डॉ. डी. एल. कराड, सरचिटणीस, सीटू