आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाेटभर पाण्यासाठी संघर्ष नित्याचाच, ऐन परीक्षांत विद्यार्थ्यांची हंडे घेऊन दूरवर पायपीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुठे दोन-दोन किलोमीटरपर्यंत तर कुठे एक किलोमीटरहून अधिक रस्ता काही ठिकाणचे काटे तुडवत पाण्याच्या शोधात वणवण भटकावे लागत आहे. यामध्ये महिला, तर पुढे असतातच, पण ऐन परीक्षांच्या काळातही विद्यार्थ्यांना हाती पुस्तके नव्हे, तर हंडे, कळशा आणि चऱ्हाट घेऊन फिरावे लागत आहे. त्यातही सापडलीच तर कुठे विहीर दहा-दहा परसांची तर कुठे बारा-बारा परसांची. परंतु, जीव धोक्यात घालून घोटभर पाण्यासाठी रोज दूरवर पायपीट करत पाणी शेंदावेच लागते. हे चित्र काही मराठवाडा किंवा विदर्भातील नसून राज्यात विकासाचा डंका पिटणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील आहे. ‘दिव्य मराठी’ने दुष्काळाची दाहकता समजून घेण्यासाठी ग्रामीण भागात केलेल्या पाहणीचा हा लाइव्ह रिपोर्ट...

गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बहुतेक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे जिथे पाणी दिसते त्या विहिरींवर लोकांची गर्दी उसळते. त्यात काही ठिकाणी विहिरींचे मालक पाणी उचलतात म्हणून शिव्यांची लाखोली वाहतात. पण काही दानशूर पिकांना नाही पण पिण्यासाठी पाणी देण्याचा धर्म निभावत आहेत. चांदवड तालुक्यातील वाहेगाव, रायपूर, दुगावमध्ये तर महिलांना पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटरहून अधिक पायपीट करावी लागत आहे. निफाड, सिन्नर आणि चांदवडमधील अर्थकारण ज्या उन्हाळ कांद्यावर अवलंबून असते तिथे पाणी नसल्याने सारा खर्च आणि घेतलेले कष्ट मातीमोल होत आहेत. वाहेगावसाळ येथील सुभाष सयाजी गांगुर्डे यांनी सव्वा एकर उन्हाळ कांद्याला सुरुवातीला पाण्याचे टँकर विकत घेऊन पाणी दिले परंतु, जमिनीला पुरेसे पाणी मिळाल्याने कांद्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आणले. जिल्ह्यातील बऱ्याच भागात असेच काहीसे चित्र असल्याने शेतकरी तर संकटात आहेच, पण बाकी लोकांनाही पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकावे लागत आहे.

टँकर कागदावरच : पाण्याच्या टँकरमध्येही शासनदरबारी मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याची चर्चा येथे आहे. इथले चित्र पाहिले तर दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो हे कागदावरच दिसते. वाहेगाव येथे दोन महिन्यांपूर्वी टँकरने होत असलेला पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कागदावरच टँकरची संख्या दिसते. प्रत्यक्षात नागरिकांना तहानलेलेच रहावे लागते.

नशीब बलवत्तर म्हणून वाचला सुनीलचा जीव
रायपूरमधील (ता. चांदवड) महिलांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी सुनील वाळू पवार हा सातवीतील विद्यार्थी आईला मदत म्हणून पाणी उपसण्यासाठी विहिरीवर गेला. कठडा नसल्याने तोल जाऊन तो बारा परस विहिरीत पडला. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला.

चाळीस हजारांवर पाणी
कांदा लागवडीपासूनते आतापर्यंत ४० हजार रुपये खर्च झाले. मात्र पाणीच नसल्याने सर्व कष्ट वाया गेले असून आता हातात काहीच येणार नाही. - सुभाष गांगुर्डे, वाहेगावसाळ

मतांसाठी येतात फक्त
धुणे,भांडे आणि अांघोळीसाठी लागणारे पाणी दूरच. पण प्यायचे पाणीही मिळणे मुश्कील आहे. अधिकारी आणि पुढारीही लक्ष देत नाही. फक्त मत मागायला येतात, पण नंतर माणूस आहे का गेला त्याची त्यांना फिकीरही नसते. - सुमन अहिरे, रायपूर
रायपूर (ता. चांदवड) | कठडा नसलेल्या विहिरीवरून पाणी शेंदण्यासाठी जीव धोक्यात घालून मोठ्यांसह लहान्यांनाही अशी रोज कसरत करावी लागते. छाया : अशोकगवळी
बातम्या आणखी आहेत...