आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दररोज राखेत जातेय 15 हजार घनमीटर पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एकलहरे औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रातून बाहेर पडणार्‍या राखेत मंगळवारपासून दररोज दहा हजार घनमिटर पाणी वाया जात आहे. राज्यात दुष्काळची स्थिती असतांना नाशिकमध्ये मात्र हे चित्र पहायला मिळते आहे. प्रकल्पातून बाहेर पडणारी फ्लाय अँश (उडणारी राख) पुरवठा थांबविण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ही विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रातून बाहेर पडणार्‍या राखेवर प्रक्रिया करून ती विक्री करण्यासाठी डर्क इंडियाने महानिर्मितीसोबत तीस वर्षांचा करार केला होता. दरम्यान काही मुद्यांच्या संदर्भात दोघेही उच्च न्यायालयात गेले होते. याबाबत न्यायालयाने मंगळवारी आदेश देत डर्क इंडियाचा पुरवठा तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार याच दिवशी दुपारी तीन वाजेपासून पुरवठा थांबविण्यात आला. या प्रकल्पातून दिवसाकाठी बाहेर पडणार्‍या चार हजार पैकी एक हजार मेट्रिक टन फ्लाय अँश (राख) डर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दररोज उचलत होते, ते बंद झाले. त्यामुळे पाण्याचा वापर दैनंदिन 15 हजार घनमीटरने वाढला आहे.


असे जाते पाणी राखेत
औष्णिक ऊर्जा प्रकल्पात विजेच्या निर्मितीसाठी कोळशाचा वापर केला जातो. कोळसा जाळून निर्माण होणार्‍या उष्णतेचा वापर त्यासाठी होतो. बाहेर पडणारी राख हवेत उडू नये यासाठी पाण्याची फवारणी केली जाते. याकरिता दिवसाकाठी 55 ते 60 हजार घनमीटर पाण्याचा वापर होतो. मंगळवारपासून हा वापर 15 हजार घनमीटरने वाढला आहे.


डीबी स्टारनेही टाकला होता प्रकाश
‘दैनिक दिव्य मराठी’ने डीबी स्टारमध्ये यापूर्वी या प्रकल्पातून बाहेर पडणारी राख पूर्ण क्षमतेने उचलण्यास डर्क इंडिया कंपनी कमी पडत असल्याकडे लक्ष वेधले होते. यामुळे निर्माण होणार्‍या समस्यांची भीषणता यात मांडण्यात आली होती.


आम्ही सांडपाणी वापरतो
राखेवर फवारणीसाठी पाण्याचा वापर दोन दिवसांपासून निश्चितच वाढला आहे. मात्र तो कमी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही ताजे पाणी न वापरता महापालिकेने सोडलेल्या सांडपाण्याचाच वापर यासाठी करतो. लवकरच नवा ठेका देण्याचे प्रयत्न सुरू असून प्रश्न लवकरच मार्गी लागेल. कैलास चिरूटकर, मुख्य अभियंता, महानिर्मिती


कंपनी सर्वोच्च न्यायालयात
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंगळवारपासून आमचे काम बंद आहे. या निकालाला आव्हान देत डर्क इंडियाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.त्यावर लवकरच तोडगा अपेक्षित आहे. रणजित वर्मा, महाव्यवस्थापक, डर्क इंडिया


येथून येते पाणी
या केंद्राकरिता सांडपाणी वापरले जात असल्याचा दावा असला तरी हे पाणी तपोवनातील मलजलशुध्दीकरण प्रकल्पातून जाते. येथील वसाहतीत पिण्यासाठी दारणा धरणातून पाणी आरक्षण आहे. राखेवर फवारणीकरिता पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.


15,000 घनमीटर पाण्याचा रोज वाढला वापर.
100 लिटर पाणी एका व्यक्तीला वापरासाठी दिवसाकाठी लागते.
1.5 लाख लोकांची दररोज भागू शकते पाणी वापराची गरज.