आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Director General Of Police Imamdar Was Present In Nashik Vasant Lecture At Nashik

पोलिसांना निर्भीडपणे काम करू दिले पाहिजे, माजी पोलिस महासंचालक इनामदारांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कोणताही गुन्हा घडताच पोलिसांना जबाबदार धरण्यात येते. पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चादेखील रंगते. मात्र, पोलिसांनी कठोर कारवाई केली, तर लगेच राजकारण केले जाते. असे करता पोलिसांना निर्भीडपणे आणि निःपक्षपातीपणे काम करू दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी पाेलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केले.
यशवंत महाराज पटांगणावर आयोजित नाशिक वसंत व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्र पोलिसांची कार्यक्षमता’ या विषयावर ते शुक्रवारी बोलत होते. इनामदार पुढे म्हणाले की, अपवाद वगळता राज्यातील बहुतांश पोलिस कर्तव्यदक्ष असून ते सदैव आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडतात.
गुन्हेगारांचा शाेध घेणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांना त्यांची भूमिका सकारात्मकपणे पार पाडता येत नाही. राजकीय नेत्यांच्या जवळच्या माणसांवर कारवाई झाली की, लगेचच पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर विधानसभेत चर्चा करून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळे पोलिस कठोर पावले उचलण्यास धजावत नाहीत किंवा तसे करण्यापूर्वी ते त्यानंतरच्या परिणामांचा विचार करतात. यातूनच त्यांच्या कर्तव्यदक्षतेवरदेखील परिणाम होत असतो. मात्र, त्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. केवळ पोलिसांवर आरोप करत, त्यांना थेट दोष दिला जातो.
सध्या गुंडगिरी मोठ्या प्रमाणात फोफावली असून, पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःदेखील जागृत राहून गुन्ह्याचा शोध घेताना पोलिसांना मदत करून सहकार्य करण्याची गरज असल्याचे इनामदार यांनी शेवटी स्पष्ट केले.