आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गोखले एज्युकेशन’ला माजी विद्यार्थी देणार ‘गुरुदक्षिणा’..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थी हे महाविद्यालयाचे सगळ्यात मोठे देणेकरी असतात असे म्हणतात. गोखले एज्युकेशन सोसायटीचे हेच ऋण फेडण्यासाठी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन प्रांगणाला ‘गुरुदक्षिणा’ दिली जाणार आहे. संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्ताने माजी विद्यार्थ्यांकडून संस्थेला भव्य सभागृह भेट दिले जाणार अाहे.
माजी विद्यार्थ्यांच्या निधीतून महाविद्यालयीन प्रांगणात म्हणजेच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगरीमध्ये हे गुरुदक्षिणा नावाचे सभागृह उभारले जाणार आहे. ७०० लोकांची आसनक्षमता असणाऱ्या या सभागृहाचे लोकार्पण संस्थेच्या शंभराव्या वर्धापन दिनाच्या दिवशी होणार आहे. नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारच्या सभागृहाची गरज ओळखून ही घोषणा करण्यात आली आहे. या सभागृहाची धारण क्षमता खालील सभागृहात ५०० लोकांची, तर बाल्कनीमध्ये २०० लोकांची आहे. यामध्ये वेळप्रसंगी अॅम्पिथिएटरदेखील करता येईल अशी सोय केली जाणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या निधीमधून हे सभागृह उभे केले जाणार असल्याने त्याच्या उभारणीची संपूर्ण जबाबदारी माजी विद्यार्थ्यांनी पेलली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ऋण फेडण्यासाठी आपली जबाबदारी म्हणून हे काम हाती घेतले आहे.

महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयाशेजारील मोकळ्या जागेत हे सभागृह उभारले जाईल. ज्यामध्ये महाविद्यालयाव्यतिरिक्त बाहेरील कार्यक्रमांनादेखील परवानगी दिली जाणार आहे. यामुळे प्रांगणात येणाऱ्यांची संख्या वाढीस लागेल. या सभागृहासाठी बाहेरील व्यक्तींकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून सभागृहाची देखभाल केली जाणार आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराव्यतिरिक्त स्वतंत्र रस्ता या सभागृहासाठी काढून दिलेला आहे. त्यामुळे इतर महाविद्यालयीन घडामोडींना त्याचा अडसर होणार नाही. येत्या दोन वर्षांत या सभागृहाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले.

प्रथमच सोहळा..
संस्थेचा माजी विद्यार्थ्यांसाठी तसेच संस्थेच्या इतर घटकांंसाठी येती दाेन वर्षे महत्त्वाची अाहेत. त्यामुळे येत्या १९ फेब्रुवारीला मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या साेहळ्यास संस्थेच्या हितचिंतकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

१९ फेब्रुवारीला मुहूर्तमेढ..
गाेखले एज्युकेशन साेसायटीचा यंदा १९ फेब्रुवारी २०१६ रोजी वर्धापन दिन अाहे. याचबराेबर संस्थेचे हे शतकपूर्ती वर्षही अाहे. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांकहून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला असून, त्याची औपचारिक मुहूर्तमेढ संस्थेच्या वर्धापन दिनाच्या भव्य सोहळ्यात रोवली जाईल. हजारो माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी या साेहळ्याचे साक्षीदार होणार असल्याची माहिती युनिव्हर्सल ग्रुपचे सीईओ आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी प्रशांत खंबसवाडकर यांनी दिली.