आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, Pune University Started Examination Portal, Divya Marathi

पुणे विद्यापीठातर्फे आता ‘एक्झामिनेशन पोर्टल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ऐन परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका फुटणे, सदोष गुणपत्रिका मिळणे, निकाल उशिरा समजणे अशा पारंपरिक चुकांमुळे विद्यार्थ्यांना बसणारा फटका टाळून, परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने पुणे विद्यापीठ आता लवकरच स्वतंत्र ‘ऑनलाइन एक्झामिनेशन पोर्टल’ सुरू करणार आहे. विद्यापीठात 3 मार्चला होणार्‍या पदवीदान समारंभात या पोर्टलचा शुभारंभ होणार आहे.

परीक्षा पद्धतीत आधुनिकता आणण्याहेतूने विद्यापीठाकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पारदर्शकता आणतानाच वेळेचा अपव्ययही या नव्या सुविधेमुळे टळेल. पोर्टलवर विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विभाग असेल.

असे आहे पोर्टल :
एक्झामिनेशन पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या लिंकमध्ये परीक्षा फॉर्म ऑनलाइन भरणे, परीक्षेचे वेळापत्रक (चार महिने अगोदर), परीक्षेचा अभ्यासक्रम, निकाल, पेपरची फोटोकॉपी, पुनर्तपासणी, जुन्या प्रश्नपत्रिका अशी सर्व माहिती उपलब्ध राहणार आहे. विशेष म्हणजे स्मार्ट फोनवरूनही ती मिळू शकेल. तर, महाविद्यालयांसाठी असलेल्या लिंकमध्ये स्टेशनरी, परीक्षा फॉर्म इनवर्ड करणे, इंटर्नल गुण पाठविण्यासह इतर गोपनीय माहिती अशा सुविधा उपलब्ध असतील.

पारदर्शकता येईल
परीक्षा पद्धतीत पोर्टलमुळे पारदर्शकता येण्यास मदत होईल. परीक्षाविषयक सर्वच माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना तत्काळ अद्ययावत माहिती समजेल. वेळेची बचत होऊन विद्यार्थी व महाविद्यालयांना त्याचा फायदा होईल. डॉ. दिलीप धोंडगे, प्राचार्य, केटीएचएम

विद्यार्थ्यांना होईल फायदा
एक्झामिनेशन पोर्टलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेविषयक सर्व माहिती सहजरीत्या मिळू शकणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्ट मोबाइल असल्याने विद्यार्थ्यांना चटकन व कमी खर्चात माहिती उपलब्ध होऊ शकेल. प्रमिला भामरे, परीक्षा अधिकारी, केटीएचएम