छायाचित्र: पोलिसांनी ताब्यात घेतलेले कार्यकारी अभियंता संजय दशपुते
नाशिक - पंतप्रधान ग्रामसडक याेजनेंतर्गत केलेल्या कामाच्या अाणि देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल मिळावे, या मागणीसाठी अालेल्या ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्ष पकडले. कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यापाठोपाठ या खात्यातील हे दुसरे लाचखोरीचे माेठे प्रकरण उघडकीस आले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार गावांमधील रस्त्याचे मातीकाम अाणि डांबरीकरणाच्या कामासह पुढील पाच वर्षे देखभालीचा ठेका एका ठेकेदाराने घेतला हाेता. त्यासाठी बँकेत ३३ लाख रुपये अनामत रक्कमदेखील बँक अाॅफ बडाेदा शाखेत जमा केली हाेती. त्यानंतर ठेकेदाराने १५ फेब्रुवारी २०१५ ला रस्त्याचे काम पूर्ण केले असल्याने जमा केलेली अनामत रक्कम परत मिळावी अाणि डांबरीकरण केलेल्या रस्त्यांच्या देखभालीच्या बिलाची रक्कम मिळावी, अशी विनंती त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांना केली. त्यांनी दशपुते यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली हाेती. अखेर तडजाेडीतून एक लाख रुपये देण्याचे निश्चित झाल्यानंतर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याबाबत तक्रार केली. त्यानंतर काॅलेजराेडवरील अंबर अपार्टमेंटमधील राहत्या घरी दशपुते यांना लाच स्वीकारताना प्रत्यक्ष पकडण्यात अाले. त्यानंतर त्यांच्या घरझडतीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते.