आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकपपूर्वीच चालणार केबल ग्राहकांची मर्जी, नाशिकमधील महत्त्वाच्या दोन कंपन्यांचे पॅकेजेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शासनाने आदेश दिल्यानंतर पॅकेज जाहीर करण्यास विलंब लावलेल्या केबल कंपन्यांनी आता ऐन वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवरच ते जाहीर केल्याने ग्राहकांना हव्या त्याच चॅनल्सचे पॅकेज घेता येणार असून, तेवढेच पैसे भरावे लागतील. त्यामुळे वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी आता ग्राहकांचीच मर्जी चालणार आहे. मात्र, त्यासाठी दराचा छुपा भुर्दंडदेखील सोसावा लागणार आहे.
शासनाने एप्रिल २०१३ रोजी केबल डिजिटलायझेशनचा निर्णय लागू करत केबलचे पॅकेज जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, ब्रॉडकास्टर्सला करारानुसारच ‘एमएसओ’ पैसे भरत असल्याने तेही ग्राहकांकडून सर्वच चॅनल्सचे मिळून दर आकारत होते. परंतु, आता ब्रॉडकास्टर्सने स्वतंत्र चॅनल्ससाठी दर आकारण्याची (अला-कार्ट) पद्धती लागू केली. त्यानुसार प्रत्येक ग्राहकाला ते दर आकारले जात आहेत. दुसरीकडे शासनाने केबल कंपन्या, ब्रॉडकास्टर्सची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आणि ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीचे पॅकेज जाहीर करण्याचे आदेश दिले. परंतु, केबलचालक, एमएसओ, ब्रॉडकास्टर्स आणि शासन यांच्यातच वाद निर्माण झाला. तो थेट न्यायालयात गेला. त्यामुळे करमणूक कर भरण्यापासून ते पॅकेज जाहीर होण्यापर्यंत सर्वच बाबींमध्ये विलंब झाला. अखेर केबल कराचा तिढा सुटला. त्यानंतर लागलीच न्यायालयाने नाशिकच्या ‘एमएसओं’ना महिनाभरात पॅकेज प्रणाली लागू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार केबलचालकांनी अगदी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवरच ते जाहीर केले. त्यामुळे आता केबल ग्राहकांना हवे ते चॅनल्स घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वर्ल्डकपचे सामनेही स्टार स्पोर्ट‌्स-२ आणि स्टार स्पोर्ट‌्स-३ अशा दोन्ही चॅनल्सवर प्रसारित होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही चॅनल्स ग्राहकांना कमीत कमी दरात कसे मिळतील यासाठी एक चॅनल पॅकेजमध्ये आणि एक चॅनल स्वतंत्र किंवा दोन्ही चॅनल्स असलेले पॅकेजही ‘एमएसओं’नी ग्राहकांना उपलब्ध केले आहे. त्यामुळे ग्राहकांना सर्वसाधारण पॅकेज आणि केवळ वर्ल्डकपचेच सामने बघावयाचे असल्यास तीही सुविधा आता उपलब्ध झाली आहे.
केबलकंपन्यांची पाच पॅकेजेस : केबलकंपन्यांनी पाच पॅकेजेस तयार केली आहेत. त्यात १५८ रुपयांपासून ते ४१९ रुपयांपर्यंतचे पॅकेजेस उपलब्ध आहेत. पहिल्या दोन पॅकेजमध्ये कुठलाही स्पोर्ट‌्स चॅनल किंवा इंग्रजी करमणूक, चित्रपट, बातम्यांची चॅनल्स उपलब्ध नाहीत. दरम्यान, केबल कंपन्यांनी कमीत कमी १५८ रुपयांचे महिन्याचे पॅकेज उपलब्ध केले असताना डिश कंपन्यांनी (एअरटेल, व्होडाफोन, टाटा स्काय) तेवढ्याच चॅनल्सचे कमीत कमी २६० रुपयांचे पॅकेज सध्या ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत.
स्पोर्ट‌्स चॅनल्स महागड्या पॅकेजमध्ये
सर्वांनाचस्वतंत्र दर देण्याऐवजी तयार केलेल्या पॅकेजमध्ये २७५ रुपयांपासून पुढच्या दराच्या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्यापेक्षा कमी दराच्या पॅकेजमध्ये स्टार स्पोर्ट‌्सचे चॅनल्स नसून, २७५ पेक्षा कमी दराचे पॅकेज घेणाऱ्या ग्राहकांना हे चॅनल्स स्वतंत्र पैसे देऊन सुरू करता येतील.
पॅकेज महिनाभर : एकदाग्राहकाने केबलचे कुठलेही पॅकेज घेतले तर ते कमीत कमी महिनाभर कायम करणे बंधनकारक नंतरच ते बदलता येईल.
दरवाढीचा भुर्दंड मात्र ग्राहकांच्याच माथी
केबलकंपन्यांनी शासनाच्या आदेशानुसार जाहीर करावयाचे चॅनल्सचे पॅकेज ऐन वर्ल्ड कपपूर्वीच जाहीर करत जणू ग्राहकांना ते घेण्याचे बंधनकारकच केले. शिवाय त्यात सर्वसाधारणपणे शंभर ते दीडशे रुपयांची वाढ करून हा भुर्दंड ग्राहकांच्याच माथी मारला आहे. परंतु, हे दर ब्रॉडकास्टर्सने लागू केलेल्या अला-कार्ट अर्थात, प्रतिचॅनल्स शुल्क पद्धतीमुळे पे-चॅनल्सच्या संख्येत वाढ झाल्यामुळेच वाढल्याचा आरोप ‘एमएसओं’नी केल्याने आता वर्ल्ड कपपूर्वीच केबलवाद पुन्हा पेटण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय ज्या पॅकेजमध्ये बहुतेक सर्वच चॅनल्सचा समावेश आहे, अशी चॅनल्स ही पूर्वी दीडशे ते अडीचशे रुपयांत मिळत होती. आता त्यांचे दर ३५० ते ४१९ रुपये झाले आहेत. म्हणजे १०० ते १५० रुपयांनी केबल महाग झाली आहे.