आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कालबाह्य औषधांचा ट्रक उद्योगभवनातच आणा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कालबाह्य औषधांचे डम्पिंग सुरू असताना पकडलेला ट्रक घटनास्थळावर 20 दिवसांनंतरही तसाच उभा असल्याबद्दल संताप व्यक्त करीत गुरुवारी उद्योजकांनी तो एमआयडीसी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय असलेल्या उद्योगभवनाच्या आवारात आणून उभा करा, अशी मागणी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली.

वेअर हाऊसजवळील मोकळ्या भूखंडावर 12 जुलैला हा ट्रक उद्योजकांनीच पकडला होता. ट्रकमध्ये ‘विषारी कचरा’ समजला जाणार्‍या कालबाह्य औषधांची पोतीच भरलेली होती. गुन्हा दाखल होऊन वीस दिवस उलटल्यानंतरही कागदी घोडे नाचवण्यापलीकडे कारवाई झालेली नसल्याने उद्योजक व कामगार औषधांच्या उग्र दर्पाने त्रासले आहेत. महामंडळ वा जागेची मालकी असलेल्या एमआयडीसीला जाग येत नसल्याने उद्योजक संतप्त झाले आहेत. आयमाचे अध्यक्ष सुरेश माळी, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, निखिल पांचाळ, राजेंद्र अहिरे यांच्यासह उद्योजकांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात धडक दिली. मात्र, एकही वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित नसल्याने प्रादेशिक अधिकारी ए. एस. फुलसे यांच्याकडे त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. फुलसे यांनी ते मुंबईत असल्याचे सांगून ‘या कामाबाबत लगेचच निर्णय होण्यासाठी प्रयत्न करतो; जेणेकरून शुक्रवारी सायंकाळपर्यंत ट्रक हलवता येणे शक्य होईल,’ असे आश्वासन उद्योजकांना दिले.