नाशिक - इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे नांगरणी करताना शेतकर्याला स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने रविवारी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नाशिक व मालेगाव येथील बॉम्बशोधक पथकाने हे स्फोटक निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.
शेणीत (ता.इगतपुरी) येथील संदीप तुकाराम कुंडारिया यांची येथे वडिलोपार्जित शेतजमीन असून ही जमीन गेली अनेक वर्षांपासून पडिक आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास संदीप हे जमीन नांगरत असताना त्यांच्या नांगराला एक धातूची संशयित वस्तू लागून जमिनीच्यावर आली. या स्फोटकातून पहिल्यांदा धूर येऊ लागला आणि नंतर या वस्तूने पेट घेतला. त्यामुळे भयभीत झालेल्या संदीप यांनी पळ काढत याबाबत गावकर्यांना माहिती दिली.
दरम्यान, देवळाली तोफखाना सराव केंद्र हाकेच्या अंतरावर असल्याने लष्करांनी सराव केल्यानंतर स्फोटकांचे काही तुकडे या भागातील शेतात पडतात. यातील काही स्फोटकांचा अखेरपर्यंत स्फोट होत नसल्याने ही दारू गोळ्याची जिवंत स्फोटके शेतात पडतात. हे स्फोटक देखील त्याचाच प्रकार असल्याचा अंदाज स्थानिक पोलिसांनी वर्तवला आहे.