आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छबू नागरेच्या पत्नीवर खंडणीचा गुन्हा दाखल, पतसंस्थेच्या एजंटला जिवे मारण्याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बनावट नोटाप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष छबू नागरेची पत्नी प्रीती नागरे यांनी त्या व्यवस्थापक असलेल्या पतसंस्थेच्या एका एजंटला अाठ दिवसांत कर्ज फेडल्यास फाेनवर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी नागरे यांच्याविरुद्ध भद्रकाली पाेलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

खुटवडनगर येथील मायक्रो फायनान्स पतसंस्थेत विशाल सुरेश दिंडे (रा. गंजमाळ, जुने नाशिक) हे एजंट म्हणून कार्यरत हाेते. दिंडेंनी पतसंस्थेतून कर्ज घेतले असून, त्यापैकी ८७ हजार रुपये थकीत कर्ज भरण्यासाठी पतसंस्था कर्मचाऱ्यांनी रक्कम भरा बाकीची थकीत रक्कम नंतर द्या, असे सांगितले होते. मात्र, पतसंस्थेच्या व्यवस्थापक प्रीती नागरे यांनी दिंडे यांना फोनवर शिवीगाळ करून आठ दिवसांत कर्ज फेडण्यास सांगितल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. तक्रारीनुसार, त्यांना दूरध्वनीवरून फाेन अाला. यावर दिंडे काही बाेलण्यापूर्वीच समाेरून व्यवस्थापक नागरे यांनी उद्याच्या उद्या बँकेत येऊन दहा हजार रुपये भर आणि आठ दिवसांत संपूर्ण कर्जाची परतफेड करून खाते बंद कर, नाहीतर तुझा बेत पाहील, अशी धमकी दिली. 
 
या संभाषणात नागरे यांनी वारंवार दिंडे यास शिवीगाळ करीत ‘तुला माहीत नाही, नागरे काय करू शकतात अाणि नागरे काय अाहेत’, अशा शब्दात दम भरत जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले अाहे. दरम्यान, बनावट नाेटांप्रकरणी अटकेत असलेले छबू नागरे याने जबाबात दिंडे याचे नाव सांगण्याचीही धमकी दिल्यानेच अापण पाेलिसांत तक्रार दिल्याचेही पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी बुधवारी (दि. ११) रात्री भद्रकाली पोलिस ठाणे गाठून प्रीती नागरे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची फिर्याद दाखल केली आहे. रात्री उशिरापर्यंत प्रीती यांचा शाेध सुरू हाेता. भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.