आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारसाठी 425 जादा बसेस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - श्रावण मासातील तिसर्‍या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आणि ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सुमारे 425 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मेळा बसस्थानकावरून दर पाच मिनिटाला बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग र्शीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे असल्याने देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक येत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी दरवर्षी महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात येते. तिसर्‍या सोमवारसाठी 425 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथे लाखोंच्या संख्येने युवा वर्ग ब्रम्हगिरीच्या फेरीसाठी नाशकात दाखल होत असतो. गत वर्षी साधारणत: 384 बसेसद्वारे एक हजाराहून अधिक फेर्‍या पूर्ण करीत 3.5 लाख भाविकांची वाहतूक करण्यात आली होती. तर यंदा सुमारे चार लाख भाविकांच्या वाहतुकीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रविवारी दुपारपासूनच मेळा बसस्थानकावरून दर पाच मिनिटाला बसेस सोडण्यात येणार आहेत. रविवार दुपारपासून ते सोमवारी रात्री उशिरापर्यंत बसेसच्या फेर्‍या सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेळा बसस्थानकाबरोबरच निमाणी, नाशिकरोड बसस्थानकातूनही बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खंबाळे येथे वाहनतळ उभारण्यात आले असून, याठिकाणाहून सुमारे 125 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी बसेस व पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला असून, विभागीय नियंत्रक कैलास देशमुख, पोलिस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी संयुक्त पाहणी दौरा केला.
मेळा बसस्थानकावरील मार्ग वाहतुकीस बंद - तिसर्‍या र्शावणी सोमवारनिमित्ताने लाखोंच्या संख्येने त्र्यंबकेश्वर येथे प्रदक्षिणेसाठी जाणार्‍या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीबीएस चौकातून शरणपूररोड व मेळा बसस्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग रविवारी दुपारपासूनच बंद करण्यात येणार आहेत.

पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनेनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसर्‍या सोमवारसाठी रविवारी दुपारपासूनच मेळा बसस्थानकावर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी 2 वाजेपासून सीबीएसपासून मेळा स्थानकाकडे जाणार्‍या मार्गांवर प्रवेश बंद करण्यात येणार आहे. यात, सीबीएस चौकातून शरणपूररोडने टिळकवाडी चौफुलीपर्यंतचा रस्ता एसटी बसेस वगळता इतर वाहनांसाठी बंद राहणार आहे. सीबीएस चौकातून टिळकवाडीकडे जाणारी वाहने मोडक सिग्नल, त्र्यंबक नाका, हॉटेल राजदूतमार्गे अथवा सीबीएसवरून मेहेर चौकातून पुढे अशोकस्तंभ मार्गे पुढे जातील. तसेच, शरणपूररोडवरील वाहनांना सीबीएसकडे जाण्यासाठी टिळकवाडी सिग्नलवरून सावरकर तरण तलावाकडे येऊन त्र्यंबकनाक्यावरून पुढे जावे लागेल. अथवा पंडित कॉलनीतून अशोकस्तंभ मार्गावरून जाता येईल.

हॉटेल राजदूत समोरून नवीन बसस्थानक, मेळा बसस्थानक हा मार्गदेखील बसेस वगळता दोन्ही बाजूने इतर वाहनांना बंद राहणार आहे. ही अधिसूचना रविवार ( 5 ऑगस्ट ) दुपारी 2 ते सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत कायम राहणार असून, या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.