आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक झाले खर्‍या अर्थाने ‘नेटवर्किंग फॉर सोशल कॉज’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- फेसबुक हे टाइमपास, चॅटिंग आणि अफवा पसरविण्यासाठीच असते असा समज होण्यासारखे चित्र गेल्या काही महिन्यांपासून पुढे येत आहे. पण, फेसबुकला खर्‍या अर्थाने ‘सोशल नेटवर्क’ करण्याचे कामही काही तरुण करीत आहेत. त्यातीलच एक सिलिकॉन व्हॅली संस्थेचे संस्थापक प्रमोद गायकवाड. गरजू रुग्णांची माहिती फेसबुकवर देऊन त्यांना मदतीचा हात देण्याचे काम त्यांच्या ग्रुपने केले आहे. नुकतेच एका रिक्षाचालकाच्या मुलावर उपचार करण्यासाठी लागणारा निधी फेसबुकच्या माध्यमातून जमा करण्याची मोठी कामगिरी त्यांनी केली आहे.
फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कचा वापर चांगल्या कामासाठीही होऊ शकतो, हे प्रमोद गायकवाड यांनी ‘नेटवर्किंग फॉर सोशल कॉज’ या अभियानातून दाखवून दिले आहे. त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी आलेल्या विमनस्क अवस्थेतील भगवान मराठे या रिक्षाचालकाचा दहावीत शिकणारा मुलगा राजेश गेल्या अडीच महिन्यांपासून यकृत खराब झाल्याने आजारी आहे. नाशकातील एका मोठय़ा हॉस्पिटलने भगवानकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यावर उपचार न करता डिस्चार्ज दिला. जिल्हा रुग्णालयातही या रुग्णाच्या पदरी निराशा आली. पुन्हा उपचारासाठी राजेशच्या वडिलांची भटकंती सुरू झाली. आपल्याजवळील किडूक-मिडूक विकून त्यांनी राजेशच्या उपचारावर खर्च केला; परंतु त्यातून फारसे काही साध्य न झाल्याने चरितार्थाचे साधन असलेली रिक्षाही मातीमोल किमतीत त्यांनी विकून टाकली. पण तरीही उपचारासाठी पुरेसा पैसा जमा झाला नाही.
या संकटात भर घातली आणखी एका घटनेने. नातवाला डबा पोहोचवण्यासाठी भगवान यांच्या आई दवाखान्यात जात असतानाच त्यांना अपघात झाला. त्यात त्यांचा पाय मोडला. त्याही उपचाराविना बसून आहेत. ही सर्व सत्यकथा ऐकून प्रमोद गायकवाड यांचे डोके सुन्न झाले. त्यांनी लागलीच फेसबुकच्या त्यांच्या अकाउंटवर भगवानची आपबिती विशद केली आणि बघता-बघता राजेशच्या उपचारासाठी पैसे जमा होऊ लागले. मराठे कुटुंबीयांना मदत करण्यासाठी 9422769364 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नेटवर्किंग फॉर सोशल कॉजचे उपक्रम
> प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये रक्तदान शिबिरे
> दिवाळीत आदिवासींना कपडे व फराळ वाटप
> सोलापूर येथील एचआयव्हीग्रस्त बालकांना पुस्तके वाटप
> मराठवाड्यातील राजपिंप्री गावात दुष्काळात टॅँकर
> हरणांना पाणी देण्यासाठी बीड जिल्ह्यात पाण्याच्या टाक्या
> संस्थेच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवशी सामाजिक संस्थेला मदत
2010 पासून विविध उपक्रम
ओबामा यांनी फेसबुकचा वापर सकारात्मक कामासाठी केल्याचे वाचले होते. तेव्हापासूनच फेसबुककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 2010 मध्ये आम्ही ‘नेटवर्किं ग फॉर सोशल कॉज’ सुरू केले. त्यातून सामाजिक उपक्रम राबवले. त्यांना तरुणाईने भरभरून प्रतिसाद दिला आहे.
-प्रमोद गायकवाड, संस्थापक, नेटवर्किंग फॉर सोशल कॉज