आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा माहात्म्य: हरित कुंभासह लाल अन‌् सफेद कुंभाचीही तयारी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महानगरात भरणारा कुंभ हा हरितकुंभ व्हावा, या उद्देशाने अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. त्यांना जणू कृतकृत्य वाटावे अशीच नदीची अन घाटांची सद्यस्थिती आहे. कुंभमेळ्यासाठी बांधलेल्या घाटांजवळ शेवाळे, पाणवेली आणि डबक्यांतील हिरवाई सर्वार्थाने ‘हरित’ राखण्याचे काम महापालिका इमानेइतबारे करीत आहे, तर मनपाचे मलजल शुध्दीकरण प्रकल्प म्हणजे ‘सफेद’ कुंभ आणि ‘लाल’ कुंभ भरविण्यासाठी कटिबद्ध असल्याप्रमाणे कार्यरत आहेत.

आराेग्याशी खेळ
नाशिकमधील पर्वणीच्या दिवशी साधू , संत, महंतांची संख्या ते लाख आणि प्रत्येक पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या किमान २५ ते ३० लाखांच्या आसपास राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाहेरगावच्या ज्या भाविकांना प्रशासनाकडून या घाटांवर आणले जाईल, त्या भाविकांचे स्नान म्हणजे आराेग्याशी केला जाणारा खेळच ठरण्याची शक्यता आहे. केवळ रामकुंडाच्याच स्नानांकडे लक्ष देण्यातच मग्न असलेल्या प्रशासनाला घाटावरील सामान्य नागरिकांच्या स्नानाबाबत , तेथील पाण्याच्या शुध्दतेबाबत लक्ष द्यायला फुरसत मिळण्याची शक्यता कमीच दिसते.
अनाेखा ‘त्रिवेणी संगम’
कुंभमेळा तीन महिन्यांवर येऊनही महानगराच्या हद्दीतील नदीपात्राच्या गुणवत्तेत तसूभरही फरक पडलेला नाही. नदीतील पात्रात विविध ठिकाणी शेवाळे, पाणवेली, घाटाच्या कामांसाठी उकरलेल्या मातीचे ढीग अगदी नजर फिरेल तिकडे यथास्थित अाहेत. त्यात मनपाच्या मलजलशुद्धीकरण प्रकल्पातून ( एसटीपी ) बाहेर पडणारे पाणी म्हणजे केवळ सफेद फेस अाहे. तर एसटीपीतून बाहेर पडल्यानंतर ते पाणी ज्या किनाऱ्यानजीक पाेहाेचते तिथे पाण्याला लाल - तांबूस रंग अालेला दिसताे. त्यात भाविकांच्या स्नानासाठी बांधलेल्या घाटांपर्यंत पाेहाेचणारे पाणी सफेद रंगाचे फेसाळ पाणी असून, यंदाचा कुंभ भाविकांसाठी हरितच नव्हे, तर लाल अाणि सफेद कुंभ म्हणूनदेखील स्मरणात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.असा हा हरित, लाल अाणि सफेद कुंभाचा ‘त्रिवेणी संगम’ याेग मनपाच्या ‘सजग’ कारभारामुळे पर्वणी साधू इच्छिणाऱ्या भाविकांवर येणार अाहे.
जादा पाणी साेडून शुद्धीकरणाची मखलाशी अशक्य
गाेदावरीही बारमाही नदी नसल्याने धरणातून पाणी साेडले, तरच ते प्रवाही राहते. त्यात पावसाळ्यात पर्वणी असल्याने बऱ्यापैकी पाणी वाहते असते. मात्र, यंदापासून शाहीस्नानासाठी साधुंचा मार्ग हा गाडगेमहाराज पुलाखालून रामकुंडापर्यंत अाणला अाहे. पर्वणीपूर्वी धरणातून जादा पाणी साेडून पाणी स्वच्छ राखण्याची मखलाशीदेखील प्रशासनाला करता येणार नाही. त्यामुळेच त्याखालच्या भागात येणाऱ्या घाटांवर तपाेवन अाणि टाकळीच्या एसटीपी प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणीच भाविकांचे स्नानासाठी पाेहाेचणार अाहे. ते काय लायकीचे अाहे, ते वेगळे सांगायला नकाे.
पुढे वाचा...