आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facture Politics Turninto Capture Mode In Nashik

नाशकात ‘फ्रॅक्चर’वरून राजकारण ‘कॅप्चर’ करण्याची धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहराला झालेले ‘फ्रॅक्चर’ दूर करण्याचा विडा राज ठाकरे यांनी उचलून दीड वर्ष उलटल्यानंतरही पालिकेतील सत्ताधारी मनसेला साधी रस्त्यांची डागडुजी करता न आल्याचा आरोप करीत मातब्बर विरोधकांनी राजकीय हवा ‘कॅप्चर’ करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला मनसे उत्तर देत असतानाच अन्य पक्ष व नेत्यांनाही एकाएकी शहर विकासाचा उमाळा आला आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांनी तर रिंग रोडचे काम नवीन असल्याचे सिद्ध केल्यास पाच लाखांचे बक्षीसच जाहीर केले आहे. या सर्व चिखलफेकीत विकासाच्या मुद्याकडे दुर्लक्षच होत असल्यामुळे हे सारे राजकीय पेच-डावपेचापुरते र्मयादित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फूलबाजाराच्या स्थलांतरावरून राजकीय हवा अचानक गरम झाली आहे. सराफ बाजारात पाणी तुंबण्यामागे फूलबाजारातील घाण असल्याचे कारण देत मनसेने स्थलांतराचा निर्णय घेतला. त्यावरून फूलविक्रेते आक्रमक झाल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी केली. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीमागे ‘मतांचे राजकारण’ असून, हा भांडण लावण्याचा प्रकार असल्याची टीका मनसे आमदार वसंत गिते यांनी केली. त्याला राष्ट्रवादी व काँग्रेसनेही चोख उत्तर दिले. काँग्रेसचे आमदार जयप्रकाश छाजेड यांनी थेट राज ठाकरे यांनाच लक्ष्य करीत खासगीकरणासाठी धरला जाणारा आग्रह मुंबईतील मित्रांच्या नवनिर्माणासाठी असल्याचा आरोप केला, तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी खुंटलेला शहर विकास, खराब रस्ते व अन्य मुद्यावरून मनसेला खिंडीत गाठले.

रिंगरोडचे काम डिफर्ड पेमेंटद्वारे करण्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या रोडचे काम होईल तेव्हा होईल; पण सध्या तरी ठेकेदार मंडळींप्रमाणे पुढारीही ‘रिंग’च करीत आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.

वर्षभरावर आलेली लोकसभा निवडणूक व गेल्या वेळी मनसेने मारलेली मुसंडी लक्षात घेत या पक्षाला कसेही करून रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनाही सरसावली आहे. रस्ते बुजवल्यानंतर पावसाच्या चार धारांतच त्यांचे मूळ रूप उघडे पडत असल्याचे दिसूनही सर्वच पक्षांचे नगरसेवक दुरुस्तीचा अट्टहास धरीत आहेत. विरोधी नगरसेवकांनी कायमस्वरूपी, टिकाऊ रस्त्यांसाठी ठोस उपाययोजना वा सूचना करणे अपेक्षित होते. मुळात, उन्हाळ्यातच चांगले रस्ते करण्यासाठी विरोधकांनीही जोर न लावल्यामुळे आता खराब रस्त्यांवर होणारी टीका राजकारणाचा एक डाव मानली जात आहे.


हे मुद्दे विरोधकांच्या रडारवर
प्रथम फूलबाजार स्थलांतर व त्यानंतर खराब रस्ते, तसेच खड्डय़ांवरून सत्ताधारी मनसेला खिंडीत गाठण्यात आले. आता साथीचे रोग, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घाईत मंजुरी, पाणीकपात व पाणीगळती आदी विषय विरोधकांच्या रडारवर आहेत. या मुद्यांवरून मनसेला घेरण्यासाठी रणनीती आखली जात आहे. राष्ट्रवादीने वाक्युद्धाचा मार्ग स्वीकारल्यानंतर काँग्रेसनेही त्याचाच अवलंब केला आहे. आमदार जयप्रकाश छाजेड यांनी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘बोलते’ होण्याचा सल्ला दिला आहे.