आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाखांच्या बनावट नोटा जप्त, सप्तशृंगी गडावर १४ जण ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नशिक - श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे माजी सरपंच संदीप बेनके यांच्या जागरूकतेमुळे बनावट नोटा चलनात आणणारे मोठे रॅकेट उघड झाले आहे. तब्बल तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून १४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सप्तशृंगगड येथे रविवारी सकाळी ९.३० वाजेदरम्यान शिवालय तलावापासून हे संशयित देवीच्या दर्शनासाठी जात हाेते. वाटेत येणार्‍या काही दुकानात ५० ते ७० रुपयांची एखादी वस्तू विकत घ्यायची. त्यासाठी एक हजार रुपयांची बनावट नाेट द्यायची उर्वरित पैसे परत घ्यायचे. हा प्रकार बेनके दहातोंडे यांच्या लक्षात आला. या दाेघांनीही काही सहकार्‍यांच्या मदतीने संशयितांचा पाठलाग केला. अधिक माहिती घेतली असता त्यांनी १२ दुकानदारांकडे खरेदी केली प्रत्येकाला एक हजाराची नाेट देऊन उर्वरित पैसे परत घेतल्याचे उघडकीस आले. त्यामुळे दहाताेंडे त्यांच्या सहकार्‍यांनी पहिल्या पायरीसमोरील दुकानात एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ १२ हजारांच्या बनावट १० हजारांच्या चलनी नोटा आढळून आल्या. त्यासोबत असलेल्या दोघांकडे तीन हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या. साेबत अजून साथीदार असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे दहाताेंडे पाेलिसांना माहिती देण्यासाठी जीपने निघाले असता नांदुरी येथे त्यांना (एमएच २३/ ३३३३) एक चारचाकी गाडी आढळली.

ही गाडी आमची असल्याचे संशयितांनी सांगितले. दहातोंडे बेनके यांनी ती आठंबे येथे अडविली. या गाडीमध्ये दोन पुरुष, दोन तरुण मुले, चार महिला चार छोटी मुले होती. त्यांच्याकडेे दोन लाख ७५ हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. संशयित आरोपींना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील गाडी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील एका भाजप कार्यकर्त्याची असल्याचे पाेलिसांनी सांगितले. २७ हजार रुपयांच्या बनावट नोटा दुकानदारांनी जमा केल्या असून, त्याही पोलिसांकडे देण्यात येणार आहेत.

रोहित विष्णू काळे ( १८), रोहन विष्णू काळे ( १६), रूपा विष्णू काळे (३५), पूनम रोहित काळे (१८), नंदा दत्तू काळे (४५), रेश्मा दिलीप पवार (२२), सारिका राहुल चव्हाण (२३), लक्ष्मी दत्तू पिंगळे (३०), शंकर रामदास चव्हाण (१६), अरुण दत्तात्रेय चव्हाण (१५), नानाजी दिलीप पवार (१४).
नंदुरबारमध्ये पाचशेच्या बनावट नोटांचे बंडल
नंदुरबारमधील संजय टाऊन हॉलजवळ पाचशेच्या बनावट नोटांचे पाचहून अधिक बनावट बंडल रविवारी सापडले. हे बंडल एका लाल कपड्यात बांधले हाेते. पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या आहेत.

संजय टाऊन हॉलजवळ रविवारी सकाळी सात वाजेला सफाई कर्मचारी काम करत होते. त्या वेळी एका महिलेच्या नजरेस या नोटा पडल्या. नगरसेवक कुणाल वसावे यांनी या घटनेची गंभीरता लक्षात आणून दिल्यानंतर पोलिस काॅन्स्टेबल मुन्ना निकुंभ यांनी नोटा जप्त केल्या. या नोटांजवळ उदबत्ती काजळी आढळून आल्याने हा प्रकार जादूटोणाशी निगडित असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

या नोटा एका बाजूने त्या छापलेल्या असून दुसर्‍या बाजूला कोर्‍या आहेत. गुजरातमधे उत्पादित केलेल्या कागदांचा उपयोग नोटा तयार करताना करण्यात आला आहे. धावत्या गाडीतून या नोटा फेकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या नोटा कुठे छापण्यात आल्या? याचा शोध घेतला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...