आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंडासाठी उद्योजकांना फसवे इ-मेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विल्होळी आणि अंबड एमआयडीसीमध्ये ड्रॉ काढून भूखंड वाटप प्रक्रिया पूर्ण केली असून, तातडीने पन्नास हजार रुपये स्टेट बॅँकेच्या खात्यात जमा करावे, असे आवाहन करणारा इ-मेल सध्या अनेक उद्योजकांना येत आहे.

जिल्हा उद्योग केंद्राची वरिष्ठ समन्वयिका असल्याचा उल्लेख करून एका महिलेच्या नावाने हे मेल येत आहेत. दरम्यान, मेलमध्ये उल्लेखिलेल्या क्षेत्रात एमआयडीसीकडून अद्याप एक इंचही भूसंपादन झाले नाही. या प्रकारे ड्रॉ काढून एमआयडीसी भूखंड वितरित करीत नसल्याने या मेलला भुलून अनेक उद्योजकांची लूट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मेल पाठविलेल्या व्यक्तींना चुनेकर नामक एक व्यक्ती काही उद्योजकांना दूरध्वनी करून मेलचा संदर्भ देऊन ‘मी पैसे भरत आहे, आपणही पैसे भरावे आणि भूखंड मिळवावा’ असे आवाहन करीत आहे. यात संदर्भ दिलेला एसबीआय खाते क्रमांक संभाजी स्टेडियमजवळील शाखेत अस्तित्वात आहे. उद्योजकांना मेल येत असलेल्या इ-मेलवर संपर्क केला असता प्रतिसाद मिळत नसल्याने हा गोलमाल असल्याचे स्पष्ट झाले आहे. या फसवेगिरीमुळे उद्योग जगतात खळबळ उडाली असून, या प्रकाराबाबत चर्चा सुरू आहे. ज्यांना असे मेल प्राप्त झाले, त्यांचा गोंधळ उडाला आहे.

जिल्हा उद्योग केंद्रात ही व्यक्तीच नाही
शीला देशपांडे-ढिकले या फसव्या नावाने लोकांना इ-मेल येत आहे. ही बाई जिल्हा उद्योग केंद्राची वरिष्ठ समन्वयिका असल्याचे म्हटले आहे. मात्र, जिल्हा उद्योग केंद्रात या नावाची कोणी व्यक्ती नसल्याने उद्योजकांनी सावध राहावे. साहेबराव पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र

या मेलसंबंधी तक्रारी निमाकडे आल्या असून, ज्यांना हा मेल आला, त्यांनी पैसे भरू नये आणि तक्रारी द्याव्यात. धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा