आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न घडलेल्या अपहरणातून पोलिस, शिक्षकांची धावाधाव; 840 पालकांसह यश नावाच्या 14 मुलांशी संपर्क

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वेळ सकाळी 11.30 वाजेची. पोलिस ठाण्यातला फोन खणखणतो. एका लहान मुलाला तोंडाला रूमाल लावून पळवल्याची घटना समजते आणि तातडीने नाकेबंदी केली जाते. उपआयुक्तांपासून ते निरीक्षक, कर्मचार्‍यांचा ताफा शाळेत पोहोचतो. तास-दोन तास विद्यार्थी, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालकांची चौकशी केल्यानंतर अपहरणाचा प्रकार घडलाच नसल्याचे लक्षात येते. अर्थात गेल्या काही दिवसांतील घटनांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार म्हणजे पोलिस, शिक्षकांची परीक्षाच घेणारा ठरला.
पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, सहायक आयुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक सुरेश सपकाळ यांनी विद्यालय गाठले. ज्या मुलींनी हा प्रकार सांगितला, त्यांना एका खोलीत शिक्षकांनी बसवले. 9-10 वर्षांच्या दोन्ही इयत्ता तिसरीत शिकणार्‍या मुलींना अधिकार्‍यांनी विश्वासात घेतले. आमच्यासोबत डबा खाणार्‍या तिसरीच्या ‘यश’ला व्हॅनमधून आलेल्या दोघांनी तोंडाला रूमाल बांधून नेले. पोलिसांनी मुख्याध्यापकांना यश नावाच्या मुलांना तत्काळ हजर करण्याचे सांगितले. तर उर्वरित हजर, गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून विद्यार्थी घरी पोहोचला की नाही त्याची खात्री करण्यास सांगितले. शिक्षकांनी 840 पालकांशी संपर्क साधला असता मुले सुखरूप असल्याचे सांगितले. तर, यश नावाच्या 14 विद्यार्थ्यांना बोलावून घेत मुलींसमोर हजर केले. यावर मुलींनी यातील कोणीही नसल्याचे सांगितल्याने पोलिस, शिक्षकांच्या चिंतेत आणखीच भर पडली. एकीकडे ही चौकशी सुरू असताना दुसरीकडे नाकेबंदी करून विद्यार्थी वाहतूक रिक्षा, व्हॅनची तपासणी करण्यात येत होती. तसेच, सर्वच पोलिस ठाण्यांना बेपत्ता अथवा मुलगा घरी आला नसल्याची तक्रार प्राप्त होताच कळविण्याची सूचनाही देण्यात आली. अखेर अडीच ते तीन तासानंतर कुठलीही तक्रार अथवा पालक शाळेत न आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.