आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fake Singnature News In Marathi, Nashik, Magic Pen, Ink, Divya Marathi

सावधान! मॅजिक पेनची शाई, रक्कम हातोहात जाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - इतरांनी भरलेले धनादेश किंवा अन्य कागदपत्रांवर बिनदिक्कत विश्वास ठेवून तुम्ही स्वाक्षरी करीत असाल तर आजच सावध व्हा. कारण, अशा स्वाक्षरीचा फायदा घेऊन धनादेशावरील अदाकर्त्याचे नाव आणि रक्कमही बदलण्याची ‘जादू’ सध्या सुरू झाली आहे. यासाठी ‘मॅजिक पेन’चा वापर केला जात असून, अशा काही घटना उद्योग जगतात घडल्याने बँकांनी ग्राहकांना जागरूक राहण्याचा इशारा दिला आहे. काही बँकांनी ग्राहकांना इ-मेलद्वारे या प्रकारच्या फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे.


देशभरात गाजलेल्या ‘धर्मभास्कर’ प्रकरणाप्रमाणे धनादेशावरील रकमा, तसेच अदाकर्त्याच्या नावात बदल करून लाखो रुपये लाटण्याचे प्रकार आतापर्यंत घडले आहेत. पण, अगदी योग्य धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतरही त्याद्वारे फसवणूक होण्याची प्रकरणे समोर आल्याचे बँकांनी म्हटले आहे. अशा घटनांमध्ये धनादेशावर खातेधारकाची स्वाक्षरी घेतल्यानंतर ज्याला रक्कम अदा करायची आहे, त्याचे नाव आणि रक्कम बदलून ‘हपापाचा माल गपापा’ केला जातो.


शाई करता येते नाहीशी..
यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘मॅजिक पेन’मधील शाई विशेष प्रकारची असते. ती कागदावरून पूर्णपणे नाहीशी करता येते. त्यामुळे कागदपत्र, धनादेश बदलता येतो. असे पेन अगदी 200 रुपयांपासून ऑनलाइन शॉपिंगद्वारे उपलब्ध आहेत.

असा घातला जातो गंडा
‘सावजा’ला कागदपत्रे किंवा धनादेशावर स्वाक्षरी करायला सांगितले जाते. मॅजिक पेनने भरलेला अन्य तपशील धनादेश टाकताना बदलला जातो. काही प्रकरणांत धनादेश रद्द केल्याचे दाखवून नंतर ‘कॅन्सल मार्क’ नाहीसा करीत धनादेश उपयोगात आणला जातो.