आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवल्यात शेतकरी उद‌्विग्न; मेथीच्या जुड्या फेकल्या, जुडी फक्त 60 पैशाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- एकीकडे अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करत असताना आता अत्यल्प बाजारभावामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. मंगळवारी बाजारात विक्रीला आणलेल्या मेथीला शेकडा साठ रुपये भाव मिळाला म्हणून शेतकऱ्याने सुमारे सातशे जुड्या रस्त्याच्या कडेला फेकून देत संताप व्यक्त केला.
येवला बाजारात मंगळवारी देवठाण येथील शेतकरी त्र्यंबक खिल्लारे यांनी मेथीच्या भाजीच्या जुड्या विक्रीला आणल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे सातशे रुपये शेकडा मेथीला भाव मिळाला. यामुळे समाधानी असलेल्या खिल्लारे यांनी मोठ्या आशेने आज बाजारात माल आणला. मात्र, मंगळवारी केवळ शेकडा साठ रुपये म्हणजे ६० पैसे जुडी इतका कमी दर पुकारण्यात आला.

आतबट्ट्याचा व्यवसाय
वास्तविक मजुरी, भाजी उपटणे, भाडे, बियाणे, खत, मशागत यांचा खर्च विचारात धरला तर या भाजीचा खर्च सुमारे साडेतीन हजार होता. मात्र, ६० पैसे जुडीप्रमाणे त्यांना केवळ ३५० रुपयेच मिळणार होते. यामुळे वैतागून खिल्लारे यांनी या जुड्या जनावरांपुढे टाकून दिल्या. अल्पदर मिळाल्याने खिल्लारे यांनी विक्री करण्यापेक्षा भाजी फेकण्यातून आपली उद्विग्नता व्यक्त केली.
बाजारात आज चारशे रुपयांपर्यंत भाव होता, पण मी भाजी विक्रीसाठी थोडा उशिरा आलो आणि खरेदीदारांनी हिरवी भाजी असल्याचे कारण देत भाव कमी दिला, अशी खंत खिल्लारे यांनी बोलून दाखवली.