आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता शेतकर्‍यांकडून भाजीपाला जाणार थेट ग्राहकांकडे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शेतकर्‍यांना शेतमालाचा योग्य दर मिळावा व ग्राहकांनाही माफक दरात भाजीपाला मिळावा यासाठी कृषी विभागातर्फे आता शहरातील कॉलनी व सोसायट्यांमध्ये ताजा व स्वस्त भाजीपाला 6 फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शुक्रवारी जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात कृषी व पणन अधिकारी आणि शेतकरी व शहरातील सोसायट्यांच्या सभासदांची बैठक झाली. या बैठकीत वरील उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. शहरातील ग्राहकांना दलालांमुळे भाजीपाला अधिक दराने खरेदी करावा लागतो. शेतकर्‍यांनाही शेतमालाचे कमी पैसे मिळतात. शासनाच्या कृषी व पणन विभागाने यावर तोडगा काढला आहे. ग्राहक व शेतकरी यामधील मध्यस्थ काढून थेट खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानुसार 19 जानेवारीपासून नाशिक बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी किरकोळ विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्यासाठी कोणतीही बाजारपट्टीची फी व सेस आकारण्यात येत नाही.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत शेतकरी सकाळी 8 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान भाजीपाला विक्री करतील असे ठरले. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे, उपनिबंधक चंद्रकांत बारी, कृषी पणन उपसरव्यवस्थापक सुभाष घुले हे उपस्थित होते.