आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये खतासाठी पैसे नसल्याने विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पत्नीचे मंगळसूत्र विकूनही खतासाठी पुरेसे पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त गंगा म्हाळुंगी येथील भाऊलाल पालवे या शेतकऱ्याने बुधवारी रात्री विषप्राशन करून आत्महत्या केली. संतप्त कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह गुुरुवारी सकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठेवून निष्क्रिय सरकारचा निषेध केला.
नाशिक तालुक्यातील गिरणारे गावाजवळील गंगा म्हाळुंगी येथील शेतकरी भाऊलाल पालवे यांची पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी शेतात भाताचे पीक लावले आहे. तीन आठवड्यांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकटही टळले. त्यामुळे पालवेंसमोर पिके जगविण्याची मोठी समस्या होती. यासाठी त्यांना खते खरेदी करायची होती आणि त्यांना त्यासाठी १२ हजार रुपयांची गरज होती. मित्रमंडळींकडे मागणीही केली. पण मदत मिळाली नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी पत्नीचे मंगळसूत्र विकण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यातूनही केवळ १५०० रुपयेच हाती येत होते. या पैशातूनही खते खरेदी करता येत नव्हती. यामुळे निराश झालेल्या भाऊलाल यांनी बुधवारी रात्री मृत्यूला कवटाळले, अशी तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, भाऊलालचा मृतदेह त्याच्या संतप्त नातेवाइकांनी गुरुवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आणून ठेवला. जोपर्यंत कुटुंबीयांना मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह येथून हलवणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता.

तहसीलदार गणेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबीयांसमवेत चर्चा केली. अंत्यविधीसाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे शासनाकडून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली. तसेच शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासनही राठोड यांनी दिले. पण ‘आश्वासन नको कार्यवाही हवी,’या मागणीवर कुटुंबीय ठाम होते. अखेर प्रांत रमेश मिसाळ यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यात अंत्यविधीसाठी तात्पुरती मदत देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवून एक लाख रुपये मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तोडगा निघाला.

रिपाइंचाआंदोलनाचा इशारा
पालवेकुटुंबीयांच्या मदतीसाठी रिपाइंचे पदाधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून त्यांना रोख मदत करावी. शिवाय त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेण्याचीही मागणी त्यांनी केली. तसेच ही मागणी मान्य केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

शवविच्छेदनानंतर भाऊलाल यांचे प्रेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून आंदोलन करण्यात आले. पोटचा गोळा गमावल्यानंतर आक्रोश करताना भाऊलाल यांची आई.

दहा हजारांची रोख मदत
आत्महत्याग्रस्तशेतकरी कुटुंबाची परिस्थिती हलीखीची असल्याने प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना तातडीने १० हजार रुपयांची रोख मदत दिली. यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेत कुटुंबीयांनी मृतदेह येथून अत्यंविधीसाठी नेला.