आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षयात्रा उंबरठ्यावर असताना मालेगावात 2 शेतकऱ्यांची अात्महत्या, दुष्‍टचक्र थांबेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनाेज सावंत  (२५) आणि राकेश शेवाळे (२४) या दोन तरुण शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्‍महत्‍या केली. - Divya Marathi
मनाेज सावंत (२५) आणि राकेश शेवाळे (२४) या दोन तरुण शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्‍महत्‍या केली.
मालेगाव (जि. नाशिक) - सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून राज्यात शेतकरी अात्महत्यांचे सत्र सुरू अाहे. या दुष्टचक्रातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्वच विराेधी पक्षांच्या नेत्यांनी फडणवीस सरकारविराेधात संघर्षयात्रा काढली अाहे.
 
विशेष म्हणजे ही यात्रा नाशिक जिल्ह्याच्या मालेगावच्या उंबरठ्यावर पाेहाेचत असतानाच या तालुक्यातील दाेन कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. वाके येथील मनाेज शांताराम सावंत  (२५) व निंबायती येथील राकेश शेवाळे (२४) अशी या दाेघांची नावे अाहेत.   
 
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रा काढून सरकारविराेधात लढा देणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मालेगावच्या सभेनंतर वाके येथे सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अादींनी  शांताराम सावंत यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. शासन तसेच पक्षस्तरावरून मदतीचे  अाश्वासनही या नेत्यांनी दिले.  
 
दाेन महिन्यांत सात अात्महत्या : मालेगाव तालुक्यात दाेन महिन्यांत सात शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या. मार्च महिन्यात महादू पवार (साैंदाणे), जगन्नाथ अहिरे (नांदगाव) तर एप्रिलच्या प्रारंभीच गिगाव येथील महादू जाधव यांनी मृत्यूला कवटाळले हाेते. फेब्रुवारी महिन्यात अात्महत्या केलेल्या सरदारसिंग शिंदे (शेरूळ) व रामराव शेलार (गिगाव) या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव शासनाने मंजूर केले अाहेत. मनाेज सावंत व राकेश शेवाळे यांच्या अात्महत्यांमुळे हा अाकडा सातवर पाेहाेचला अाहे.   

अाधुनिक शेतीचा प्रयाेगही अपयशी  
वाके येथील मनाेज सावंत हे अविवाहित हाेते. ते अापल्या कुटुंबीयांसह राहत हाेते. पारंपरिक शेतीतून कमी उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी अाधुनिक पद्धतीचा अवलंब केला हाेता. त्यासाठी साेसायटी तसेच महाराष्ट्र बँकेकडून एक लाखाचे कर्ज घेतले हाेते. यातून शेततळ्याची उभारणीही केली हाेती. मात्र, शेतीपिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांना फारसे अार्थिक  उत्पन्न मिळत नव्हते. दुसरीकडे कर्जाचा डाेंगरही वाढत हाेता. याच विवंचनेतूनच त्यांनी रविवारी सायंकाळी घराजवळील शेततळ्यात उडी मारून अात्महत्या केली.   

वडिलांचे कर्ज फेडण्यास असमर्थ  
निंबायती येथील राकेश शेवाळे हेही शेतीतूनच उदरनिर्वाह करत हाेते. त्यांच्या वडिलांच्या नावे सुमारे अडीच एकर शेती अाहे. या जमिनीवर वडिलांनी साेसायटीकडून ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले अाहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतेे, त्यामुळे वडिलांनी घेतलेले कर्ज फेडण्यास राकेश असमर्थ ठरले हाेते. याच कारणावरून त्यांचे कुटुंबीय अार्थिक हलाखीत दिवस काढत हाेते. अखेर वैफल्यग्रस्त राकेश याने  रविवारी घरासमाेरील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन अात्महत्या केली. या दाेन्ही घटनांची तालुका पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात अाली  अाहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...