आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल/धानोरा - तब्बल ११ एकरांत घेतलेल्या कांद्याला योग्य भाव मिळाला नाही. यामुळे वडिलांनी शेतीसाठी घेतलेले सोसायटीचे कर्ज, सोने तारण व हातउसनवारीचे सुमारे पाच लाखांचे कर्ज फेडायचे कसे? या चिंतेने खचलेल्या जळगाव जिल्ह्यातील किनगाव खुर्द (ता. यावल) येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. मुबारक दगडू तडवी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

किनगाव येथील रहिवासी दगडू दिलदार तडवी या शेतकऱ्याकडे १७ एकर शेती आहे. या शेतीची सर्व कामे व व्यवहार त्यांचा एकुलता एक मुलगा मुबारक तडवी हा पाहायचा. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या मुबारकने यंदा सहा एकरात केळी लावली होती. तत्पूर्वी हंगामात सातत्याने ओढवलेल्या नैसर्गिक संकटांमुळे ते कर्जबाजारी झाले होते. करपा राेग आणि दर पडल्याने त्यांनी मध्यंतरी केळी उपटून फेकत ११ एकरात कांदा लागवड केली होती. कांद्याला चांगला भाव मिळून वायद्यानुसार कर्ज फेडता येईल, या आशेवर ते होते. मात्र, उत्पन्न निघायला सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे भाव पडल्याने मुबारक कमालीचे हताश झाले हाेते. या परिस्थितीत कर्जफेड करणे अशक्य झाल्याने त्यांनी बुधवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास मोहरद (ता.चोपडा) रस्त्यावरील खंडणे शिवारात झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अडावद पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

व्हॉट्सअॅपवर सुसाइड नाेट
मुबारक तडवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी जहांगीर तडवी, तसेच अापले जावई आरिफ तडवी यांना पहाटे ५.१७ वाजता व्हॉट्सअॅपद्वारे सुसाइड नोट पाठवली हाेती. हा मेसेज पाहताच जावयाने तत्काळ किनगाव येथे फोन करून मुबारक यांनी दिलेल्या मेसेजविषयी माहिती दिली. त्यानुसार मुबारकचे वडील, मित्रांनी सकाळीच मुबारकची शोधाशोध सुरू केली. मात्र, सकाळी आठच्या सुमारास पळसाच्या झाडाला लटकलेला मुबारकचा मृतदेहच त्यांना दिसून अाला.

शेतकरी हिताचा विचार न झाल्याने ही वेळ..!
‘अतोनात कर्ज झाल्यामुळे अापण आत्महत्या करीत आहाेत. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी धानोरा, कृषी केंद्र, ट्यूबवेलवाले व सोनार, सावकारांचे कर्ज फेडण्यास असमर्थ आहे. भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान असूनसुद्धा केंद्र व राज्य सरकारने भाववाढीसाठी काहीही उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती,’ असा उल्लेख मुबारक तडवी यांनी सुसाइड नोटमध्ये केलेला अाहे.
बातम्या आणखी आहेत...