आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide News In Marathi, Nashik, Hailstorm, Balgan, Divya Marathi

शेतकर्‍याची आत्महत्या,गारपिटीमुळे आलेल्या आर्थिक नैराश्यातून संपविले जीवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा - बागलाण तालुक्यात होत असलेली गारपीट, अवकाळी पावसाचे संकट आणखी तीव्र होत असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या डाळिंब आणि हरभर्‍याच्या नुकसानीचा धक्का सहन न झाल्याने दरेगाव येथील आत्माराम सीताराम पवार (वय 42) या शेतकर्‍याने रविवारी पहाटे शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गारपिटीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने जीवनयात्रा संपविण्याची ही पहिली घटना आहे.


दरेगावपासून अर्धा किलोमीटरवर त्यांची सात एकर शेती आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना व दुष्काळामुळे विकत पाणी, उसने पैसे घेऊन त्यांनी डाळिंब व हरभर्‍याचे पीक घेतले होते. आठवडाभरापासून ढगाळ हवामान, पाऊस आणि गारपिटीमुळे चांगल्या उत्पन्नाची आशा मावळत चालल्याने त्यांना नैराश्येने ग्रासले. महागडी तणनाशके फवारून वाढविलेली पिके डोळ्यादेखत नष्ट होत होती. त्यातच शनिवारीही या भागाला मुसळधार पावसाने झोडपले. त्यानंतर त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान त्यांनी शेतातीलच घरात विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी नातेवाइकांना शोक अनावर झाला बागलाण तालुक्यातील शेतकर्‍याची आत्महत्या होता. दरेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


शासनस्तरावरून मदतीसाठी प्रस्ताव
आत्माराम पवार यांच्या आत्महत्येप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, कृषी अधिकारी डी. के. कापडणीस यांनी निवासस्थानी भेट देऊन पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. परिसरातील नुकसानीची पाहणी करून त्यांनी पंचनाम्यांच्या प्रक्रियेची माहिती घेतली. शासनस्तरावरून पवार कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या मदतीबरोबरच नुकसानभरपाई देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मोसम खोर्‍यात होळी नाही
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिके नष्ट झाल्याने उपजीविकेचे, जगण्याचे साधनच हिरावले गेले आहे. त्यामुळे मोसम खोर्‍यातील बहुतांश गावांत रविवारी होळी पेटलीच नाही. त्यातच पवार यांच्या आत्महत्येमुळे या गावांवर शोककळा पसरली होती.


स्वप्नभंग झाल्याने टोकाची भूमिका
शेतीत येणार्‍या सततच्या अपयशाने आत्माराम कंटाळला होता. वेळोवेळी तो आजारीही पडायचा. अवकाळी पावसामुळे सर्वच स्वप्न पुन्हा भंगल्यानेच त्याने ही टोकाची भूमिका घेतली असावी. सीताराम पवार, वडील