आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा-बटाट्यासाठी शेतकरी संघटनेचे पिंपळगावात आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कांदा आणि बटाटा जीवनावश्यक वस्तूमध्ये आणून शेतकर्‍यांवर अन्याय केल्याने शेतकरी संघटनेने शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंत येथे मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी तासभर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे चांदवडकडून नाशिककडे जाणार्‍या मार्गावर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. 14 ऑगस्ट रोजी लासलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा जोशी यांनी या वेळी दिला.

केंद्र सरकारने कांदा आणि बटाट्याचे दर नियंत्रणात राहण्यासाठी जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश केला. निर्यात मूल्यात वाढ करून अघोषित निर्यात बंदी केल्याने या विरोधात शेतकरी संघटनेने सोमवारी पिंपळगावच्या शगुन लॉन्स येथे शेतक री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शरद जोशी म्हणाले की, सरकार नागरिकांच्या आरोग्यासाठी लागणारे औषधे जीवनावश्यक वस्तूमध्ये आणण्याचे सोडून कांदा आणि बटाट्याला जीवनावश्यक वस्तूमध्ये आणले आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार आले म्हणजे त्यांची कामगिरी खूप चांगली होती, असे नाही.

पहिल्या सरकारला जनता कंटाळली होती. मात्र, या सरकारने सत्तेवर आल्यावर पहिला आसूड हा शेतकर्‍यांवर उगारून अन्याय केला आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी पुन्हा 1980 च्या आंदोलनाची आठवण करून द्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकत्रित येण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी लासलगाव किंवा पिंपळगाव येथे संघटनेचे अधिवेशन घेण्याचे ठरवले असल्याचे जोशी यांनी सांगितले. मोदी हे शेतकर्‍यांविरोधात नसून त्यांच्याभोेवती असलेल्या दुष्ट लोकांनी शेतकर्‍यांचे वाटोळे केल्याचा आरोप त्यांनी केला.