नाशिकरोड - हात दिल्यानंतर थांबला नाही म्हणून पोलिस अधिकार्याने पाठलाग करून शेतकर्यास मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी गोदावरी नदीवरील श्री संत जनार्दन स्वामी पुलावर घडली.मारहाणीच्या निषेधार्थ नांदूर गावातील शेतकर्यांनी पुलावर धरणे धरून अधिकार्यावर कारवाईची मागणी केली.
वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर अधिकार्याने शेतकर्याची माफी मागितल्यानंतर वाद मिटला.दसक गोदावरी नदीपुलाजवळील स्मशानभूमी येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लावले आहेत. तेथे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना नांदूरगावातील शेतकरी नवनाथ निमसे मुलासह दुचाकीवरून नाशिकरोडकडून नांदूर गावात जात असताना पाेलिस अधिकारी करे यांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. निमसे यांनी इशारा बघून थांबले नाही, त्यामुळे करे यांनी त्यांचा पाठलाग केला नांदूर गावातील निमसे मळ्याजवळ नवनाथ निमसे यांना गाठून मारहाण केली. त्यावेळी समाेरच शेतात काम करणार्या वृद्ध शेतकर्याने मध्यस्थी केल्यानंतर पोलिस अधिकारी निघून गेले. वार्ता गावात समजल्यानंतर सर्व शेतकरी पुलावर जमा होऊन त्यांनी धरणे धरले. पोलिस उपायुक्त विजय पाटील, सहायक उपायुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक नारायणराव न्याहाळदे, हवालदार अशोक साळवे यांनी शेतकर्यांची समजूत काढली. मात्र शेतकरी मारहाण करणार्या अधिकार्यांवर कारवाईच्या मागणीवर ठाम राहिले. अखेर नाशिकरोड पोलिस ठाण्यात सहायक उपायुक्त अतुल झेंडे यांनी दोन्ही बाजू समजून घेतल्यावर अधिकारी करे यांनी शेतकर्याची चूक असल्याचे सांगून माफी मागितल्यावर वादावर पडदा पडला.