लासलगाव (जि. नाशिक) - गारपीटग्रस्तांना विशेष पॅकेज मिळालंच पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही आदी घोषणा देत लासलगावच्या (जि. नाशिक) शेतक-यांनी बुधवारी निफाड तहसीलवर मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही दिला आहे.
निफाड तालुक्यातील उगाव, खेडे, शिवडी, वनसगाव, सारोळे खुर्द, खडक माळेगाव, टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव, सोनेवाडी आदी गावांतील सुमारे ७०० ते ८०० शेतक-यांनी सकाळी ११ वाजता बाजार समिती उपबाजार आवारातून बैलगाडीसह हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालयात पोहचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. अॅड. रामनाथ शिंदे यांनी मनोगतात प्रशासनाने गारपिटीचे चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप केला. यावेळी काेणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माेठा पाेलिस बंदाेबस्त हाेता.
मोर्चात बैलगाडीचे आकर्षण : संतप्त शेतक-यांनी मोर्चात बैलगाडीसह सहभाग घेऊन घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले. दहा गावांतील शेकडो शेतकरी यावेळी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भरपावसातही शेतक-यांची मोठी गर्दी होती.
अनुदान जमा करण्याचे काम सुरू : मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीचे अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार डाॅ. संदीप आहेर, तहसीलदार यांनी दिली.
फलकांनी वेधले लक्ष : शेतक-यांनी विविध फलकांद्वारे कर्जमाफी करण्याची मागणी केली. शेतक-यांच्या व्यथा फलकातून स्पष्ट दिसत होत्या. दुष्काळीस्थिती असतानाही बँक खात्यावर नुकसानभरपाई जमा झाली नसल्याची खंत शेतक-यांनी व्यक्त केली.
मोठा बंदोबस्त, मोर्चा शांततेत
मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तहसील परिसरात लावण्यात आला होता. मोर्चा शांततेत संपल्यानंतर पोलिस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.