आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळी, कांद्यांच्या योग्य दरासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव / नाशिक - केळी आणि कांद्याच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात मंगळवारी रस्त्यांवर उतरून आंदोलने केली. दरम्यान, चोपडा तालुक्यातील धानोरा गावाजवळ शेतकऱ्यांनी लाखो टन केळी रस्त्यांवर टाकून "केळी फेको' आंदोलन केले.

केळीला बोर्डानुसार भाव, ताबडतोब फळपीक विमा, कापसाला ६ हजार हमी भाव आणि कापसाच्या शासकीय खरेदीच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या भागात हा पवित्रा घेतला. परिसरातील सुमारे १२०० शेतकरी या वेळी रस्त्यावर उतरले होते. मात्र, या आंदोलनास एकाही लोकप्रतिनिधीने भेट न दिल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले आहेत. आगामी पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास अत्यंत तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलनकर्ते तसेच माजी सभापती डी. पी. साळुंखे यांनी दिला आहे. मागील महिनाभरापासून व्यापारी केळीची खरेदी बोर्डापेक्षा कमी करत आहेत. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. वास्तविक, या विक्रीतून शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. मात्र, नाइलाजास्तव ते केळीची विक्री आहेत. विशेष म्हणजे अांध्र प्रदेश, कजगाव, भडगाव, अक्कलकुवा भागात अत्यंत स्वस्त दरात केळी उपलब्ध असल्याने व्यापारी जळगावकडील केळी घेण्यास उत्सुक दिसत नसल्याचीही परिस्थिती आहे.
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा ठिय्या
नाशिक - कांदा निर्यातमूल्य कमी करावे, या मागणीसाठी शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील कळवण अाणि नामपूर येथे दीड तास रास्ता राेकाे आंदोलन करण्यात आले. देवळा व उमराण्यात राष्ट्रवादीतर्फे रास्ता राेकाे अांदाेलन करण्यात अाले. त्वरित निर्यातमूल्य कमी न झाल्यास १३ डिसेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या अांदाेलनात कांदा व्यापारी व बाजार समिती संचालकांसह व्यापाऱ्यांनी सहभागी हाेत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला.

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारस नेहमी प्रमाणे कांद्याच्या लिलावास प्रारंभ झाला. त्यात कांद्याला ५०० ते ७०० रुपये भाव पुकारल्याने शेतकरी संतप्त झाले, मागील आठवड्याच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याची शेतकऱ्याची भावना झाल्याने अनपेक्षितपणे कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडले. व सुमारे २०० शेतकऱ्यांनी कळवण-देवळा रस्त्यावर ठाण मांडले. महसूल, पोलिस खात्याला अांदाेलनाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व संतप्त शेतकऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी एेकण्याच्या तयारीत नव्हते. उत्पादन खर्च व मिळणारे उत्त्पन्न यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यात कांद्याचे दर कमी करून शेतकऱ्याला आर्थिक त्रास दिला जात असल्याचा अाराेप अांदाेलक शेतकऱ्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...