आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् शेतकऱ्यांनी पावसालाच संपावर पाठवण्यासाठी केले होमहवन, शासनाच्या धोरणांचाही निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सटाणा (नाशिक) - बागलाण तालुक्यातील धांद्री गावात शेतकऱ्यांनी होमहवन करून वरुणराजाला संपावर जाण्याचे साकडे घातल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 
सर्वत्र दमदार पाऊस व्हावा, वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी नेहमीच ठिक-ठिकाणी प्रार्थना केली जाते. परंतु धांद्री येथील शेतकऱ्यांनी होमहवन करत टाळ-मृदंगाच्या गजरात वरुणराजा बेमुदत संपावर जा, अशी विनवणी केली.
 
या कारणासाठी पावासाला संपावर जाण्याची विनंती
विविध अडचणींवर मात करून मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. अस्मानी, सुलतानी संकटांना वैतागलेल्या शेतकऱ्यांनी उद्धविघ्न अवस्थेत हा निर्णय घेतला आहे. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न ऐकायला नेत्यांना वेळ नाही. शेतकरी संघटीत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या संपासाठी येथील शेतकऱ्यांनी सटाणा-मालेगाव मार्गावरील धांद्री फाट्यावर होर्डिंग लावून, पत्रके वाटून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाऊस पडला नाही तरी हंगामच लागणार नाही, शेतकऱ्यांचीही शासनाला किंमत कळेल व तोट्यातील शेतीचा तोटाही कमी होण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
 
शासनाच्या धोरणांचा निषेध
शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव, अनिल दळवी, चिंतामण शिरोळे, अशोक शेवाळे आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते. आम्हाला कर्जमुक्ती हवी, भीक देऊ नका. शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. बॅंकांपासून बाजार समित्यांपर्यंत सर्वच ठिकाणी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. शेतीव्यवसाय बंद करण्याची वेळ या शासनाने आणली आहे. 
लाखो रुपये कर्ज काढून सोन्यासारखा शेतमाल पिकवून जर नफा होण्यापेक्षा तोटाच होत असेल तर शेती करणे बंद एवढाच पर्याय राहिला आहे. पाऊस आला तर उद्या तरी योग्य बाजारभाव मिळेल, या भाबड्या आशेने आम्ही शेती पिकवितो. मात्र बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था नेहमीच होत असल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...