आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडून दिले त्यांच्यासमोर आत्महत्या करा; सरकारी अधिकार्‍याचा शेतकर्‍याला अजब सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकरी शैलेश जिभाऊ कापडणीस - Divya Marathi
शेतकरी शैलेश जिभाऊ कापडणीस
सटाणा (नाशिक)- गारपिटमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई न मिळाल्याने बागलाण तालुक्यातील दयाणे येथील शेतकरी शैलेश जिभाऊ कापडणीस (45) यांनी तहसीलदारांच्या दालनात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.

काय आहे हे प्रकरण?
गेल्या तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील बहुतांशी भागात कांदा, टमाटे, डाळिंब, मिरची, व अन्य पिकांची मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने नुकसानीचे तत्काळ पंचनामेही सुरु केले होते. यावेळी दयाणे येथील शैलेश कापडणीस या शेतकऱ्याने पंचनामा झाल्यानंतर तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा तहसीलदार सुनील सैंदाणे यांना दिला होता. दरम्यान, तीन आठवडे उलटूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने या शेतकऱ्याने तहसीलदारांच्या दालनात जाऊन विलंब का होत आहे?, याबाबत जाब विचारला. ने कारण विचारत अचानक खिशातून आगपेटी काढून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

सरकारी बाबुने अजब सल्ला दिल्याने उचलले पाऊल...
'तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या दालनात मी व्यथा मांडण्यासाठी गेलो होतो. नुकसानाची भरपाई मिळण्यास एवढा विलंब का होताय? याबाबत त्यांना विचारणा केली. मात्र त्यांनी उलटसूलट उत्तरे दिली. नंतर त्यांना आत्मदहनाचा इशारा दिला. परंतु, ते म्हणाले, तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांच्यासमोर आत्महत्या करा. तहसीलदारांनी असा अजब सल्ला दिल्यानंतर मी त्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.' असे शैलेश कापडणीस यांनी सांगितले. इतकेच नाही तर पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अनुदान प्राप्त होताच नुकसान भरपाई बँक खात्यावर...
नुकसानीचे पंचनामे करून, तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असल्याचे व शासनाचा पुढील आदेशानुसार अनुदान प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाई जमा केली जाईल.
-सुनील सैंदाणे, तहसीलदार
बातम्या आणखी आहेत...