नाशिकरोड - तुमच्या आश्रमात बोगस डॉक्टर आहेत आणि तुमचा ट्रस्ट हा अनधिकृत असून, त्याची आमच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती आहे.कारवाईनंतर होणारी बदनामी टाळण्यासाठी एक कोटी द्या, अशी मागणी दोघा भामट्यांनी फरशीवाल्याबाबांच्या ट्रस्टकडे केली. अखेर ११ लाखांत सौदा करण्याचे त्यांनी निश्चित केले. ट्रस्टने याबाबत माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भामट्यांना पकडण्यासाठी नाशिकरोड पोलिसांनी वेशांतर करून ट्रस्टकडून ५० हजार रुपये उकळताना त्यांना पकडले.
फरशीवाल्याबाबांचा मुलगा संदीप रघुनाथ जाधव (रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा याबाबत नाशिकरोड पोलिसांत तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, संजय सुकदेव शेजवळ (कदम चाळ, भालेराव मळा) आणि भाऊसाहेब लक्ष्मणमुंडे (माडसांगवी) यांनी देवबाप्पा माउली धाममध्ये बोगस डॉक्टर आहेत आणि हा ट्रस्ट अनधिकृत असून, त्याची आमच्याकडे माहिती आहे, असे सांगितले. याबाबत कारवाई होऊन बदनामी टाळण्यासाठी सुरुवातीला त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर सौदा ११ लाखांत ठरविला. आधी ५० हजार रुपये देण्याचे सांगितले. फिर्यादीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस फिर्यादीसोबत वेषांतर करुन गेले. एका पोलिसाने म्हाताऱ्याचे, दुसऱ्याने रिक्षावाल्याचे तर आणखी एकाने गुलाल अंगावर उधळत गणेश मंडळातील कार्यकर्ता असल्याचे भासवत वेषांतर केले. दोन्ही भामटे फिर्यादीकडे पैसे घेण्यासाठी नाशिक रोड येथे आले असता पोलिसांनी त्यांना पकडले.