आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दामदुपटी’चा धंदा तेजीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अवघ्या तीन किंवा सहा महिन्यांत रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून साखळी पद्धतीच्या योजनांद्वारे ग्राहकांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार उघडकीस येऊनही अशा कंपन्यांचा धंदा तेजीत असल्याचे ग्लॅमर एंटरप्रायझेस फसवणुकीतून सिद्ध झाले आहे. दरम्यान, सोमवारी पोलिसांनी ग्लॅमरच्या कार्यालयांची झडती घेतली असता तेथे कागदपत्रे, खुर्च्या व फर्निचरव्यतिरिक्त काहीही सापडले नाही.
भद्रकाली पोलिस ठाण्यात रविवारी सुमारे 38 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवंधा चौकातील वैभव राजाभाऊ शुक्ल यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संतोष सुहास वैद्य व आरती विनायक पाटील यांनी ग्लॅमर कंपनीत गुंतवणूक केल्यास दीड ते तीन महिन्यात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवले. शुक्ल यांच्यासह नातलग, मित्रांचे पैसे घेऊन ते पसार झाले आहेत.
वैद्य व पाटील हे दोघेही नाशिकबाहेरील असून, त्यांनी काही दिवस गंगापूररोडवर भाड्याने फ्लॅट घेऊन नाशिकचेच रहिवासी असल्याचे ग्राहकांना भासविले. शिवाजीरोडवरील जिमखाना कॉम्प्लेक्स व कालिका मंदिरासमोरील कापडिया कॉम्प्लेक्समध्ये ग्लॅमर एंटरप्रायझेसचे कार्यालय सुरू केले. चकाचक फर्निचर असलेल्या या कार्यालयात विविध भाषा बोलणा-या मुलींमार्फत योजना समजविण्यात येत होत्या. कार्यालयाचे बाह्य स्वरूप पाहून आणि वैद्य, पाटील यांनी लाखाचे दोन लाख, दोनाचे आठ लाख करून देण्याचे आमिष दाखविल्याने अनेक ग्राहक फसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच संशयित फरार झाले असून, त्यांचे मोबाइलही बंद आहेत. सोमवारी पोलिसांनी त्यांच्या कार्यालयांची कुलपे तोडून झडती घेतली असता तेथे कागदपत्रे, खुर्च्या व धूळ खात पडलेले फर्निचर याशिवाय लॅपटॉप, संगणक यासारख्या वस्तू सापडल्या नाहीत.
तपास कागदावरच - दहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यावर काही दिवसांतच त्यांचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात येत आहे. मात्र, काही गुन्ह्यांमध्ये फिर्यादीसोबत दहा-पंधराच साक्षीदार पुढे येतात. उर्वरित साक्षीदार फसवणूक झाल्याचे सांगण्यास पुढे येत नसल्याने आरोपींना पकडण्यात व त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळण्यात अडचणी येतात. तसेच, फसवले गेल्यानंतर तत्काळ तक्रारी केल्या जात नसल्याने संशयित हाती लागत नाहीत.- अरविंद गायकवाड, पोलिस उपआयुक्त
15 कंपन्यांकडून कोट्यवधींची फसवणूक - वर्षभरात नाशिक व आसपासच्या परिसरात इमू, आयएमएस, गोल्डसुख, टायकून या कंपन्यांच्या योजना; तसेच मोबाइल व इंटरनेटद्वारे 50 हजार-एक लाख भरा तुम्हाला पाच लाख अमेरिकन डॉलर्स मिळतील, अशी आमिषे दाखवून लाखोंना गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 50 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे समोर आले.