आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याने १४ वर्षे मुला-मुलीला केले वाड्यात कुलूपबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंचवटीतील शनी चाैकानजीकच्या जीर्णशीर्ण वाड्यातील एका खाेलीत दाेघा सख्ख्या भावा-बहिणीला तब्बल १४-१५ वर्षांपासून त्यांच्याच वडिलांनी काेंडून ठेवल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १९) उघडकीस अाली अाहे. लांबच लांब वाढलेल्या दाढीतून विचित्र हावभाव अाणि हातवारे करीत बाेलणारे चाळिशीचे श्रीराम पुराणिक अाणि पांढरे, पिंजारलेले केस माेकळे साेडलेली त्यांची तिशी-पस्तिशीतील बहीण यांचे पांढरेफटक, निस्तेज चेहरे पाहून कुणाही सामान्य माणसाच्या अंगावर सरसरून भीतीचा काटा अाल्याशिवाय राहत नाही.
श्रीराम हे काेंडून ठेवण्यापूर्वी नाशिकच्याच एका कंपनीत प्राॅडक्शन इंजिनिअर म्हणून काम करीत हाेते. तर बहीण दहावीपर्यंत शिकलेली अाहे. दुर्दैवाचे भाेग नशिबी अालेल्या या दाेघा भावंडांपैकी भाऊ मनाेरुग्णच असून, मुलगी काहीसे सुसंबद्ध अाणि मध्येच असंबद्ध बाेलते. पंचवटीच्या मध्यवस्तीत असलेल्या या वाड्यातील अन्य नातेवाइक, शेजारी यापूर्वीच ताे वाडा साेडून गेले असून, वडील गाेदाकाठावर भीक मागून या भावंडांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था करून पुन्हा त्या खाेलीला कुलूप लावून घेत असल्यामुळेच तब्बल दीड दशकाचा काळ या प्रकाराला वाचा फुटली नसल्याचे निष्पन्न झाले अाहे. पंचवटी पाेलिसांनी वडिलांसह भावा-बहिणीला सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल केले अाहे.

त्यांचे वडील अरुण पुराणिक १५ वर्षांपासून वाड्याच्या जिन्याखालील भागातच रहात हाेते. दरराेज सकाळी गाेदाघाटावरील साई मंदिर किंवा अासपासच्या भागातून हिंडून ते दाेन्ही मुलांच्या जेवणासह पाण्याची व्यवस्था करून पुन्हा कुलूप लावून घेत असत. त्यानंतर ते त्याच वाड्याच्या जिन्याखालील भागात झाेपून रहात किंवा गाेदाघाटावर फिरून पुन्हा झाेपायला वाड्यात येत. मुलगा अधूनमधून अारडाअाेरडा करायचा, मात्र मुलगी केवळ निपचित पडून असायची. त्यामुळे तिचा गुडघ्याखालचा भागही पांगळा झालेला असून तिला महत्प्रयासानेच थाेडेसे अंतर सरकता येते.

घटना अशी अाली उघडकीस : वाड्याच्याबाहेरील भागात जिन्याखाली अरुण पडल्याचे परिसरातील नागरिकांना दिसल्याने त्यांना उचलण्यासाठी गेल्यावर त्यांच्या कुलूपबंद खाेलीतील धक्कादायक वास्तव उघडकीस अाले. मदतीसाठी गेलेल्या युवकांना बंद खाेलीतून जाेरजाेरात अावाज एेकू येऊ लागल्यामुळे त्यांनी कुलूप उघडताच अातमधील दृश्य बघून त्यांना धक्का बसला. अंगावर वीतभरही कपडा नसलेले हे भाऊ-बहीण दाेन वेगवेगळ्या काेपऱ्यात निपचित पडलेले हाेते. त्यांच्या अासपास प्रातर्विधीची घाण, केरकचरा तसेच प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य हाेते. अखेरीस त्या युवकांसह परिसरातील नागरिकांनी अापापल्या घरांतून त्यांना अंगात घालायला कपडे देऊन खाेलीत स्वच्छता केली. बुधवारी सकाळीच पंचवटी पाेलिसांनी वाड्यातील परिस्थिती जाणून घेतली. अासपासच्या नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात अाला.

प्रगतीच्या काळानंतर पुढे सारे उद‌्ध्वस्त : अरुणपुराणिक अंबडमधील एका प्रख्यात कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत हाेते. पुराणिक वाड्यात जन्मापासून राहणाऱ्या अरुण पत्नी दाेन मुलांसह राहत हाेते. मात्र, वादावादीनंतर पत्नी घर साेडून गेली. दरम्यानच्या काळात मुलगा श्रीराम इंजिनिअर हाेऊन नाशिक एमअायडीसीतील एका कंपनीत प्राॅडक्शन इंजिनिअर म्हणून रुजू झाला. काही काळानंतर कंपनीमध्ये झालेल्या काही वादग्रस्त प्रसंगांनंतर नाेकरी गमावलेल्या मुलामध्ये विक्षिप्तपणा अाल्याचे बाेलले जाते. त्याला जगापासून लपवण्यासाठी मग वडील मुलाला खाेलीत बंदिस्त ठेवू लागले. तसेच, त्या मुलाची काळजी घेण्यासाठी म्हणून मुलीलाही खाेलीत काेंडून ठेवू लागल्याने तिच्या डाेक्यावरही विपरीत परिणाम झाला असण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी बाेलून दाखवली.

किंचाळत बाेलणारा श्रीराम : श्रीरामकुणी अासपासचे बघायला अाल्यास तावातावाने असंबद्ध बडबड करताे. ‘कुणावर तरी केस केली पाहिजे’, ‘कुणावर तरी खटला भरला पाहिजे’, ‘पुराणिक कुटुंब एकत्र अालं पाहिजे’, असे पुटपुटत कंपनीतील एका व्यक्तीविरुद्ध ताे त्वेषाने किंचाळत बाेलत राहताे. तर शांत बसलेल्या बहिणीला काही विचारलं तरच उत्तर देते. तिच्या म्हणण्यानुसार ती पंचवटीतील विवेकानंद विद्यालयात दहावीपर्यंत शिकली अाहे. काेणत्या वर्षी हाेतीस दहावीला, असे विचारल्यावर ‘२००२ साली’, असे उत्तर ती देते. ‘मग त्यानंतर काॅलेजला का गेली नाहीस?’ असे विचारले तर म्हणते, ‘अाॅक्झेसिव्ह कम्पॅसिव्ह डिस्अाॅर्डर अाहे’. ‘म्हणजे काय’, असे विचारले की म्हणते, ‘काहीतरी देवाचं झालंय.’ मग डाॅक्टरांकडे गेली नव्हतीस का?’ विचारल्यावर ‘काॅलेजराेडला डाॅक्टरांकडे जायचे’, असे सांगते. ‘कुणाबराेबर अाणि कशी जायचीस?’ असे विचारले की ‘पायीच जायचे’, इथपासून मग ती अनेक असंबद्ध उत्तरे देऊ लागते. वय विचारल्यावर म्हणते ‘१६ वर्षे.’ म्हणजेच मानसिकदृष्ट्या अजूनही पाैगंडावस्थेतच असल्याचे दिसते.

या शेजाऱ्यांनी केली मदत
पुराणिक वाड्यातील हा प्रकार लक्षात येताच परिसरातील अादित्य भानाेसे, केदार विसपुते, प्रफुल्ल गायधनी, समीर खैरनार, जगदीश तलरेजा, पुष्पा माेरे, भारती जाधव अाणि परिसरातील अन्य रहिवाशांनी भावा-बहिणीला कपडे देण्यासह त्यांच्या जेवणाखाण्याची साेय करीत मदतीचा हात पुढे करीत माणुसकीचे दर्शन घडवले. मात्र, पुराणिक कुटुंबाच्या नातेवाइकांपैकी कुणीही अद्याप पुढे अालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...