आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Father Of Marathi Sports Journalism V.V. Karmarkar Facilitated In Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रीडा पत्रकारिता फुलविणार्‍या वि. वि. करमरकर यांचा नाशकात सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्राचा विकास ही नाळ एकमेकांशी जुळलेली आहे. हातात हात घालूनच ही दोन्ही क्षेत्रे विकास साधू शकतात, असे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना सांगितले. प. सा. नाट्यगृहात रविवारी रंगलेल्या या सोहळ्यात करमरकर यांची ग्रंथतुला करून त्यांना नाशिकमधील सर्व क्रीडा संघटनांच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

मराठी क्रीडा पत्रकारतेला खर्‍या अर्थाने ‘मानाचे पान’ मिळवून देणार्‍या या ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर महापौर यतिन वाघ, वनाधिपती विनायकदादा पाटील, महाराष्ट्राचे पहिले ग्रॅन्डमास्टर प्रवीण ठिपसे, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी करमरकर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले. नाशकातून चांगले खेळाडू घडण्याची प्रक्रिया काहीशी मंदावली असल्याने या खंडित परंपरेला पुन्हा एकदा वेग द्यावा लागणार असल्याचेही करमरकर यांनी नमूद केले.

निधीतून क्रीडा पत्रकारांसाठी भरीव कार्य व्हावे : मला दिलेला पुरस्काराचा एक लाखाचा निधी मी पुन्हा क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रालाच सर्मपित करू इच्छित असल्याचे करमरकर यांनी नमूद केले. त्यासाठी एक समिती गठित करून त्या निधीत महापालिकेने काही भर घालून त्या निधीच्या व्याजाचा उपयोग क्रीडा पत्रकारांसाठी करावा, अशी इच्छा असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक मंदार देशमुख यांनी तर सूत्रसंचालन उमेश आटवणे यांनी केले.

राज्य शासनाकडून करमरकरांचा सत्कार व्हावा : प्रवीण ठिपसे
करमरकरांचा सत्कार राज्य शासनाकडूनही व्हायला हवा, इतके त्यांचे कार्य मोठे आहे. सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देणार्‍या समित्यांवर करमरकर आणि त्यांच्यासारख्या नि:स्पृह तसेच अभ्यासू व्यक्तींची नियुक्ती झाल्यास त्या पुरस्कारांमधील घोटाळे थांबण्यास मदत होऊ शकणार असल्याचे महाराष्ट्राचे पहिले ग्रॅन्डमास्टर प्रवीण ठिपसे यांनी सांगितले.

कबड्डी, खो -खो, कुस्तीला करमरकरांमुळेच वैभव : जाधव
कबड्डी, खो-खोसारख्या देशी खेळांना व खेळाडूंना खर्‍या अर्थाने करमरकर यांनीच ग्लॅमर आणि वैभव मिळवून दिल्याचे अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी सांगितले. भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


आदर्श वस्तुपाठ म्हणजे करमरकर : पाटील
ज्या क्षेत्रावर प्रेम केले, त्याच क्षेत्रात जीवनभर कार्य करून त्यातून निवृत्त झाल्यानंतर त्याच क्रीडा क्षेत्रासाठी योगदान दिले आणि देत असून त्यांचे जीवन म्हणजे एक आदर्श वस्तुपाठच असल्याचे वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी सांगितले. करमरकर क्रीडा पत्रकार झाले नसते तर उत्तम बुद्धिबळपटू झाले असते, इतकी त्या खेळातही त्यांच्याजवळ प्रतिभा असल्याचे त्यांनी नमूद केले.