आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात अनाथ बालिकांचे शोषण; पाच कर्मचारी निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पेठरोडवरील तवली फाटा येथील जय आनंद निरार्शित (अनाथ) बालगृहात गत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांना रविवारी वाचा फुटली. या बालगृहातील 6 ते 14 वयोगटातील मुलींचे तेथील पाच कर्मचार्‍यांकडून लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार तेथील काही बालिकांनी महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांकडे केल्यानंतर त्यांना रविवारीच महिला बालकल्याण विभागाच्या अभिरक्षणगृहात हलविण्यात आले. दरम्यान, सोमवारी या 34 बालिकांची जिल्हा रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली.

हे बालगृह सुमारे आठ वर्षांपासून कार्यरत आहे. या बालगृहात सध्या 6 ते 14 वयोगटातील 59 मुले आणि तब्बल 34 मुली राहत आहेत. मुलींच्या शाळेव्यतिरिक्तच्या वेळेत या मुलींसमोर अश्लील चाळे करणे तसेच त्यांचे विविध प्रकारे लैंगिक शोषण सुरू होते. मुली स्नान करत असताना दरवाजे, खिडक्यांतून आत डोकावणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याची तक्रार मुलींनी महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांसमोर केली.

असे आले उघडकीस प्रकरण
महिला बालकल्याण समितीचे सदस्य रविवारी जय आनंद निरार्शित (अनाथ ) बालगृहाच्या तपासणीसाठी गेले. त्यावेळी समितीच्या महिला सदस्यांना काही मुलींनी घाबरत-घाबरत या प्रकारांबद्दल माहिती दिली. त्याची त्वरित दखल घेऊन समितीने सर्व मुलींना नासर्डी पुलानजीक असलेल्या महिला बालविकास कल्याण विभागाच्या अभिरक्षणगृहात हलविले आहे.

मुलींनी तक्रार केल्यानंतर जय आनंद निरार्शित अनाथ बालगृहातील भाऊसाहेब थोरात, संतोष थोरात, हरेश पाटील, राजेंद्र निकम आणि जगन्नाथ भालेराव या पाच कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महिला बालकल्याण समितीशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली असता, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मेडिकल रिपोर्ट हवा
याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात विचारणा केली असता, कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी बी. बी. हिवराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पंचवटी पोलिसांना रविवारीच पत्र दिले असून, गुन्हा दाखल करण्यासाठी मेडिकल रिपोर्ट लागणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मुलींना कोसळले रडू..
जिल्हा रुग्णालयात 34 लहान मुली दुपारच्या सुमारास दिसत असल्याने तिथे उपस्थित अनेकांना कुतुहल वाटत होते. प्रथमच अशी तपासणी करण्यात आल्याने त्यातील काहींना तर तपासणीनंतर रडूदेखील कोसळले.