आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉल्टी मीटर देयकांचा वीजग्राहकांना फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नरमहावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका तालुक्यातील तीन हजार ग्राहकांना बसला असून, वाढीव देयकांमुळे ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. मीटरचे कामकाज सुरळीत असूनही ते फॉल्टी दाखवण्याचे प्रकार दोन महिन्यांपासून घडत असून, ग्राहकांचे महावितरणच्या कार्यालयातूनही समाधान केले जात नसल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चुकीच्या वीजबिलांमुळे अनेकांनी तर देयके भरण्याचेच टाळले आहे. बहुतांश ग्राहक कार्यालयातील अधिका-यांकडे वाढीव वीज देयकांबाबत तक्रार करत असले तरी समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वाढीव देयके देण्याचे प्रकार दोन महिन्यांपासून वाढले असून, देयकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच वीज देयक भरण्याबाबत तगादा लावला जात असल्याने संतापात अजूनच भर पडत आहे.

देयकावर येतो शेरा
रीडिंग उपलब्ध नाही (आरएनए), इन अ‍ॅक्सेस (रीडिंग दिसत नाही), डोअर लॉक (घर बंद), फॉल्टी (मीटर बंद) असे शेरे असलेली देयके दिली जात आहेत. प्रत्यक्षात घराच्या बाहेर मीटर असलेल्या ग्राहकांच्या देयकावरही डोअर लॉकचा शेरा येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वापरापेक्षा जादा युनिटची देयके दिली जात असून, त्याबाबत तातडीने दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोनांबेचे विद्यार्थी इ-लर्निंगपासून वंचित
कोनांबे प्राथमिक शाळेला तीन महिन्यांपूर्वी 15 हजार रुपयांचे देयक देण्यात आले. त्याअगोदर दर महिन्याला 21 युनिटचे 300 रुपयांवर देयक दिले जात होते. परंतु, अचानक 15 हजार रुपयांचे देयक देण्यात आल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षक व शालेय समितीवर अवाक होण्याची वेळ आली. याबाबत मुख्याध्यापिका रेखा पवार यांनी महावितरणच्या कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या. देयक कमी न करता उलट महावितरणने मीटर काढून नेण्याची कारवाई केली. शाळेत संगणकावर इ-लर्निंगचे धडे गिरवण्यापासून विद्यार्थी वंचित आहेत.

अव्वाच्या सव्वा देयके
ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके दिली जात असल्याने शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गणपत नाठे यांना घरगुती जोडणीसाठी 13 हजार 140 रुपयांचे एका महिन्याचे देयक देण्यात आले. तर कोनांबे येथील चंद्रभान डावरे यांना 33 हजार रुपयांचे देयक देण्यात आले. वीज मीटर सुरळीत चालू असताना फॉल्टी मीटर असा शेरा देण्याचे प्रकार थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पाहणीच्या सूचना देणार
असे प्रकार असतील तर तक्रार आल्यानंतर संबंधित अधिका-यांनी जागेवर जाऊन स्पॉट इनस्पेक्शन केले पाहिजे. नेमका प्रकार काय आहे, हे तपासून ग्राहकांचे समाधान केले पाहिजे. तशा सूचना आपण देणार आहोत. अभिमन्यू चव्हाण, अभियंता, महावितरण

उत्तरे दिली जात नाहीत
- शाळेने यापूर्वी दर महिन्याला देयक भरले असताना एकत्रित देयक कसे दिले, या प्रश्नाचे उत्तर अधिकारी देत नाहीत. मीटर फॉल्टी नसताना तसे दाखवून महावितरणने मीटरही काढून नेले. आता शाळेत वीज जोडणी नसल्याने विद्यार्थी संगणकीय शिक्षणापासून वंचित आहेत.
रेखा पवार, मुख्याध्यापिका, कोनांबे प्राथमिक शाळा

देयके कमी करण्यासाठी चकरा
जून महिन्याच्या वितरित झालेल्या देयकांत वाढीव देयके देण्याचे प्रकार अधिक आहेत. तालुक्यातील 25 हजार घरगुती ग्राहकांपैकी तीन हजार ग्राहकांना वाढीव देयकांचा फटका बसला आहे. यातील बहुतांश ग्राहक देयके कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.
फोटो - डमी पिक