आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी शाळांतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीमुळे न्यूनगंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इयत्ता सातवीच्या वर्गात पहिला क्रमांक येऊनही कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता स्वत:ला इतर विद्यार्थ्यांच्या मागे असल्याचे समजून मराठी शाळेतील एका विद्यार्थ्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता. तर, दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका विद्यार्थ्याची गुणवत्ता कमी असतानाही केवळ इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने सर्वांसमोर हुशार असल्याचे तो भासवत होता. गुणवत्ता असूनही मागे पडलेल्या मराठी शाळेतील त्या मुलाने विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून घडलेल्या प्रकाराची शिक्षकांना माहिती दिली. इंग्रजी मराठी या दोन्ही भाषांमधील वाढत चाललेल्या दरीने मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ लागले असून, शिक्षकांसमोरही मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
आपला मुलगा इंग्रजी शाळेत शिक्षण घेतो, म्हणजे तो उच्च दर्जाचे शिक्षण घेत असल्याचा समज पालकांमध्ये असतो. आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनिअर व्हावे, अशी पालकांची इच्छा असते. यामधून पालकांकडून मुलांवर कळत-नकळत अपेक्षाचे ओझे लादण्यास सुरुवात केल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा सर्वाधिक ओढा असल्याने मराठी शाळांतील पटसंख्येवर परिणाम होत आहे. एवढेच नव्हे, तर मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मराठी शाळांमध्ये गेल्या सहा ते सात वर्षांत दहा हजारांहून अधिक पटसंख्या घटली आहे. त्या तुलनेत इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढतच चालले आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आधुनिक सुविधांचा अभाव, ई-लर्निंगची सुविधा नाही, स्मार्ट बोर्ड अशा विविध सुविधांची उपलब्धता नसल्याने अध्यापन करताना शिक्षकांना अनेक मर्यादा येतात. अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्याने शिक्षक तंत्रस्नेही झाले असले तरी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अशा अत्याधुनिक सुविधाच उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळांवर विपरीत परिणाम हाेत अाहे.
एकीकडे ऑनलाइन एज्युकेशन, तर दुसरीकडे मूलभूत सुविधांचा अभाव
पहिली ते दहावीपर्यंत सर्व विषयांच्या अध्यापनाची सुविधा ऑनलाइन पद्धतीने अॅनिमेटेड स्वरूपात झाली आहे. त्यामुळे मुलांना घरबसल्या ज्ञानार्जन करता येणे शक्य झाले आहे. दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पाणी स्वच्छतागृहाची सुविधाही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करताना अनेक अडचणींवर मात करावी लागत आहे. त्यामुळे इंग्रजी मराठी शाळांतील दरी वाढतच चालली आहे.
बातम्या आणखी आहेत...