आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सुरक्षारक्षक ठेका; विरोधाची धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उच्चन्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेच्या ११ रुग्णालयांत महिला सुरक्षारक्षक नेमण्याची प्रक्रिया खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला असून, खासगी ठेक्याद्वारे कर्मचारी नेमणुकीस विरोध करणारे नगरसेवक महासभेतही मानधनावर कर्मचारी नेमण्यासाठी आक्रमक होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, प्रशासनानेही शासनाचे निर्बंध अन्य सरकारी आस्थापनांच्या उदासीनतेच्या अडचणी पुढे करून महासभेच्या कोर्टात निर्णय सोपविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत खासगीकरणातून कर्मचारी नियुक्तीचे ठेके वादात सापडले आहेत. साधुग्रामबरोबरच रामकुंड भाविक मार्गाची सफाई करण्यासाठी खासगी संस्थेमार्फत कर्मचारी नियुक्तीच्या प्रस्तावावर नगरसेवकांनी आक्षेप घेतले होते. महापालिकेने मानधनावर थेट भरती करण्याची मागणीही केली होती. ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याचे पुरावेही दिले होते. दरम्यान, महापालिकेलाही शासनाचे निर्बंध आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा कमी नसल्याचे सबळ कारण असल्यामुळे खासगीकरणातून ठेका देण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. दरम्यान, आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिला सुरक्षारक्षकांची नियुक्तीही खासगी संस्थेमार्फत करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. महापालिकेला ११ रूग्णालयांसाठी १४० कर्मचारी आवश्यक असून, यात ६३ पुरुष ७७ महिला सुरक्षारक्षकांची गरज लागणार आहे.

शासनाच्या उद्योग कामगार विभागाच्या आदेशानुसार सरकारी, नमिसरकारी क्षेत्र, शासकीय मंडळे, महानगरपालिका, सहकारी संस्था शासकीय कार्यालयांत सुरक्षारक्षक मंडळामार्फतच सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचे बंधन आहे. त्यानुसार महापालिकेला पुरुष सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीची चिंता नसली तरी, ७७ महिला सुरक्षारक्षक पुरवण्यास सुरक्षा मंडळाने नकार दिल्यामुळे आता इ-टेंडरिंगपद्धतीने कर्मचारी नियुक्तीचा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी महासभेवर कोटी २४ लाख ९२ हजार ९४४ रुपयांच्या खर्चाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवला आहे.

होमगार्ड सैनिक मंडळाची उदासीनता
महापालिकेनेखासगी संस्थेला ठेका देऊन उगाच वादात अडकण्यापेक्षा सुरक्षारक्षक मंडळाबरोबरच होमगार्ड विभागालाही पत्र दिले होते. याबरोबरच जिल्हा सैनिकी बोर्डाकडेही मागणी केली होती. मात्र, होमगार्ड विभागाने महिला सुरक्षारक्षकांची कुमक पुरवण्यास असमर्थता दर्शवली. तोच कित्ता सैनिकी बोर्डानेही गिरवल्यामुळे खासगी संस्थेद्वारे नियुक्तीशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नसल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...