आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतप्रकल्प घाट्यात;विरोधकांकडून प्रकल्पाबाबत प्रशासनाची बनवाबनवी उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - खतप्रकल्पाच्या खासगीकरणासाठी प्रशासनाकडून सत्य माहिती दडविली जात असून, या प्रकल्पांतर्गत येणार्‍या स्वच्छता कराची माहिती न देताच प्रकल्प घाट्यात सुरू असल्याचे दाखवून खासगीकरणाचा घाट रचला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासंदर्भात प्रशासनाने प्रस्ताव तयार करून महासभेकडे सादर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रशासन करत असलेली बनवाबनवी उघड केली आहे.

महापालिकेने शहरातील कचरा गोळा करून त्याची वाहतूक करण्यासाठी खासगी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. शहरातून दररोज 325 मेट्रिक टन कचरा उचलला जातो. कचरा संकलन व वाहतुकीसाठी सन 2012-13 मध्ये आठ कोटी 97 लाख 82 हजार खर्च झाला. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी याच वर्षी चार कोटी सात लाख 12 हजार खर्च झाला. महापालिकेमार्फत हा खर्च होत असताना सर्वसाधारण स्वच्छता करापोटी तीन कोटी 53 लाख 23 हजार रुपये घरपट्टीत आकारणी करून प्राप्त झाल्याची माहिती मात्र दर्शविली जात नसल्याने खतप्रकल्पातून आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे समोर आणून प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

खतप्रकल्पाच्या खासगीकरणाविषयी प्रशासनाने तयार केलेल्या डॉकेटमध्ये सन 2008-09 ते सन 2012-13 पर्यंत खतप्रकल्पाच्या खर्चाचा, तसेच मिळालेले उत्पन्न आणि त्यातील फरक याविषयीची माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही माहिती देताना प्रशासनाने 2008 ते 2011 पर्यंत मिळालेल्या स्वच्छता कराविषयीची कोणतीही माहिती न देता केवळ या प्रकल्पामुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीचीच माहिती दर्शविण्यात आली आहे.

सन 2012 मध्ये झालेल्या चार कोटी सात लाख खर्चापैकी स्वच्छता करापोटी महापालिकेला तीन कोटी 53 लाख 23 हजार रुपये उत्पन्न मिळाल्याने या प्रकल्पाला केवळ 50 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.