सिडको - येथील त्रिमूर्ती चौकातील सायखेडकर हॉस्पिटलमध्ये घुसून अतिदक्षता विभागासह इतर साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. हॉस्पिटलच्या पूर्वीच्या संचालकानेच आर्थिक देवाणघेवाणीतून गुंडांच्या मदतीने ही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असून, गुन्हा दाखल झाला नसल्याचे अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सांगितले.
यासंदर्भात सायखेडकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुभाष सायखेडकर व प्रसन्ना सायखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास संशयित पनवेल येथील सुश्रूषा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संजय तारलेकर हे काही गुंड सोबत घेऊन अचानक हॉस्पिटलमध्ये घुसले. एक रुग्णवाहिका, दोन कार, ट्रक आणि त्यात सुमारे 15 ते 20 भाड्याचे गुंड असल्याचा संशय व्यक्त केला. या संशयितांनी थेट अतिदक्षता विभागात घुसून साहित्याची तोडफोड करीत एसी, फॅन, इतर साहित्य ओढून काढत गोंधळ घातला. या ठिकाणी चार ते पाच रुग्ण उपचार घेत असताना
त्यांनाही जबरदस्तीने बाहेर हुसकावून दिले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणा-यासुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी, परिचारिकांनाही त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या घटनेने रुग्ण व त्यांच्या नातलगांची धावपळ उडाली.
तोडफोड आर्थिक वादातून
संशयित संचालक डॉ. संजय तारलेकर हे 2011 ते 2013 पर्यंत सायखेडकर हॉस्पिटल चालवित होते. त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलचा ताबा डॉ. सुभाष सायखेडकर यांच्याकडे दिला. तेव्हापासून या दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा वाद होता. रविवारी डॉ. तारलेकरांनी केलेल्या तोडफोडीबाबत पोलिस तपास करीत आहेत.
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
- डॉ. तारलेकर यांनी गुंडांना घेऊन येत हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाची व त्यातील साहित्याची तोडफोड केली आहे. यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
डॉ. सुभाष सायखेडकर, संचालक, सायखेडकर हॉस्पिटल
रुग्णांना बाहेर हाकलले
- माझी आई रुग्णालयात अॅडमिट आहे. येथे आलेल्या गुंडांनी आम्हाला हाकलले. या सर्व प्रकारामुळे आम्ही खूप घाबरलो होतो. तोडफोडीच्या प्रकारामुळे रुग्णाचे हाल झाले.
अमोल हरले, रुग्णाचे नातेवाईक