आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- निकृष्ट दर्जाची अग्निशमन उपकरणे व साहित्याबाबत आलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित एजन्सींचे परवाने तत्काळ रद्द करू, असा इशारा महाराष्ट्र अग्निसेवा दलाचे संचालक आणि एमआयडीसीचे फायर सल्लागार मिलिंद देशमुख यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीज अँँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व इंडियन प्लंम्बिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फायर अँक्ट’ या विषयावरील चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे महाव्यवस्थापक मुकुल र्शीवास्तव, निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, एमआयडीसीचे विभागीय अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले, अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, इंडियन प्लंम्बिंग असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद शेटे, चौधरी, निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक राजवाडे, मंगेश पाटणकर, गजकुमार गांधी उपस्थित होते.
औद्योगिक क्षेत्राचा विचार करता प्रत्येक उद्योजकाने परवानाधारक एजन्सीकडून अग्निशमन उपकरणे खरेदी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच या एजन्सीज्ने दर्जेदार अग्निशमन साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. आजकाल अनेक अभियंते ग्राहकांचे एजंट म्हणून प्लॅन मंजुरीसाठी धडपड करतात. काही ठिकाणी लागलेल्या आगीनंतर घटनास्थळापर्यंत पोहोचायचे कष्ट व बचावातील अडचणी पाहता, इमारतीचे डिझाइन केलेल्यांना पदवी दिलीच कशी असा प्रश्न पडतो, अशी उद्विग्नताही व्यक्त केली.
राज्यातील स्थिती
नव्या अग्निशमन कायद्याची अंमलबजावणी करताना, राज्यात 100 स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अग्निशमन केंद्र तर दूर, साधा पाण्याचा टॅँकरही नसल्याचे दिसून आले. या नगरपालिका, महापालिकांना ही व्यवस्था उभारण्यासाठी राज्य शासनाने 282 कोटी रुपयांची तरतूद केली असून, या 100 ठिकाणी ही व्यवस्था उभी राहणार आहे. ज्यामुळे वर्षाला किमान 500 कोटींच्या मालमत्तेचे संरक्षण होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉक्टरांची कंजुषी येथेच का?
शहरातील रुग्णालयांनी अग्निशमन उपकरणे बसविणे सक्तीचे आहे. त्यासाठी महापालिका काही अटींवर तात्पुरती मान्यता देत असली तरी, ते अत्यंत घातक आहे. डॉक्टरांकडून फर्निचरसारख्या अनावश्यक गोष्टींवर अफाट खर्च केला जातो, मग अग्निशमन उपकरणांच्या खरेदीतच कंजुषी का केली जाते? एकतरी गरीब डॉक्टर या देशात आहे का, असा सवालही देशमुख यांनी या वेळी उपस्थित केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.