आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Love In Life Many Of People Like As Time Pass

अनेकांच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमक्षणांचा ‘टाइमपास’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लेले नावाच्या टिपिकल कुटुंबातील प्राजक्ता जेव्हा पेपर टाकणा-या अन् थोड्या उडाणटप्पू असलेल्या दगडूच्या प्रेमात पडते तेव्हा काय घडत असेल हे सांगणे खरे तर कठीण नाही. पण हे प्रेम म्हणजे केवळ तू मला मिळाली नाहीस तर दुस-याचीही होऊ देणार नाही, या भावनेच्या पलीकडे नेणारी कथा म्हणजे रवी जाधवांचा नवीन चित्रपट ‘टाइमपास’. केवळ टाइमपास म्हणून टीनएजमध्ये सहवासाचे आकर्षण निर्माण होते, पण परिस्थिती या आकर्षणाला कशी हाताळते यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचे चित्रपटातील प्रमुख कलाकार केतकी माटेगावकर, प्रथमेश परब आणि वैभव मांगले यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास भेटीत सांगितले.
या चित्रपटातून कोवळ्या वयातील पहिल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना 3 जानेवारीपासून बघायला मिळणार आहे. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला आणि एस्सेल व्हिजन, अथांश कम्युनिकेशन निर्मित व झी टॉकीज प्रस्तुत या चित्रपटात वैभव मांगले, भालचंद्र कदम, मेघना एरंडे, उदय सबनीस, सुप्रिया पाठारे, भूषण प्रधान, ऊर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत.
तरुणांच्या दृष्टीने आताच्या प्रेमाचेही बारा वाजले असून त्याला ‘टाइमपास’ स्वरूप मिळाले असल्याने ही कथा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. चिनार-महेश यांनी सजवलेली गाणी चित्रपटातील गंभीरतेत थोडी गंमत आणण्याचा प्रयत्न करतात. स्वप्निल बांदोडकर, केतकी माटेगावकर आणि बेला शेंडे यांनी ही गाणी गायली आहेत.
गंभीर बाप साकारला आहे : वैभव मांगले
मुलगी उडाणटप्पू मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा समाजातील सर्व वडील जे करतात तेच मीही करतो. सुरक्षित वातावरणात राहणारी मुलगी जेव्हा अशा मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा त्याला एक ‘सांस्कृतिक धक्का’ बसतो. केवळ शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम नाही किंवा हे वय शिकण्याचे आहे, प्रेमाचे नाही हे सांगण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. आजपर्यंत अनेक विनोदी भूमिकाच मिळाल्या, पण या चित्रपटातून थोडा गंभीर बाप मी साकारल्याचे वैभग मांगले म्हणाले.
स्क्रिप्टच हीरो : प्रथमेश
आधी टाइमपास, नंतर प्रेम, विरोध अशी गंमत यात आहे. चित्रपटाचे स्क्रिप्टच हीरो आहे. बीपीतील विशूला रिलेट करणारी भूमिका वाटते, पण एखादे कॅरेक्टर प्रेक्षकांनाच रिलेट करणारे असते. म्हणून यातील दगडू मला फार आवडल्याचे प्रथमेश म्हणाला.
प्रेमाची नवी व्याख्या : केतकी माटेगावकर
घरातून अनेक बंधने असलेली व नुकतीच कॉलेजमध्ये गेलेली मुलगी काहीही बंधने नसलेल्या मुलाच्या प्रेमात पडते. सुरुवातीला टाइमपास म्हणून बघितलेले एकमेकांना प्रेमात गुंतवत जाते. पण पेपर टाकणारा तो आणि टिपिकल मध्यमवर्गीय घरातील मी अशा परिस्थितील प्रेमाची व्याख्या काय असेल यावर चित्रपटातून प्रकाश टाकला आहे. यात मी एक गाणेही गायले आहे.