आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा घालाः उपचार घेऊन परतणारे कुटुंबीय अपघातात ठार; कार- ट्रकची धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Five dead in the Navapur accident - Divya Marathi
Five dead in the Navapur accident
नवापूर (जि. नंदूरबार): गुजरातमधून उपचार घेऊन परतणाऱ्या कुटुंबीयांच्या कार व भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन पाच जण जागीच ठार झाले. धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील जामकी शिवारातील बेलदारा फाट्याजवळ सोमवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावचे असून त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.

निमगूळ येथील बागल कुटुंबीय सोमवारी पहाटे गुजरात राज्यातील वलसाड- चिखली येथील वैद्याकडे सांधा, पाय, पाठ व कंबरदुखीवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचारासाठी गेले होते. उपचार झाल्यानंतर ते सोमवारी दुपारी मारुती कारने (एमएच-१८-डब्ल्यू-९२४३) वलसाड-चिखली येथून सुरत येथे गेले हाेते. तेथील रुग्णालयात दाखल नारायण बागल (५४, ह.मु. सोनगड, जि.तापी, गुजरात) यांच्या प्रकृतीची विचारपूस करून सायंकाळी सहाच्या सुमारास ते परत आपल्या गावी येण्यास निघाले.

रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास जामकी शिवारातील बेलदारा फाट्याजवळ धुळ्याकडून सुरतकडे जाणाऱ्या ट्रकची व बागल यांच्या कारची समोरासमाेर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की मारुती कार ट्रकने सुमारे २०-२५ फूट फरपटत नेली. त्यामुळे कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

कारमध्ये पुढील बाजूस बसलेले अनिल रामदास बागल (वय ४९, चालक, रा.निमगूळ, ता.शिंदखेडा), दिलीप फुला देवरे (वय ५८, रा.बोरीस, ता.धुळे), मागे बसलेले जयवंत राजाराम बागल (वय ५३, रा.निमगूळ, ता. शिंदखेडा), राजेंद्र श्यामराव बागल (वय ४९) व गजेंद्र भबुतमल शिसोदे (वय ५०, रा.निमगूळ, ता.शिंदखेडा) हे जागीच ठार झाले. घटनास्थळी कारच्या भागांचे व काचांचे तुकडे इतस्तत: विखुरले होते. तर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. परिसरातील नागरिकांच्या मदतीने पाेलिसांनी तातडीने मृतदेह वाहनातून बाहेर काढण्यासाठी व जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला अाहे. अपघातग्रस्त ट्रक हा मध्य प्रदेशातील होता. ट्रकचालकावर गुजरात राज्यातील उच्छल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिस त्याचा शाेध घेत अाहेत.

गावकऱ्यांनी केली मदत
अपघाताची माहिती मिळताच निमगूळचे सरपंच डॉ.वीरेंद्र बागल यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना मृतांची ओळख पटवून दिली. कारमधून दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढावे लागले. उच्छल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

मृतदेह नेण्यासाठी मोफत वाहन सेवा
मृतदेह नेण्यासाठी गुजरात राज्यातील उच्छल येथून वाहन मिळत नसल्याने नवापूर शहरातील शाहरुख खाटीक यांनी कोणताही माेबदला न घेता त्यांचा टेम्पाे उच्छल शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पाचही मृतदेह निमगूळ येथे रवाना करण्यात आले. शाहरुख खाटीक गेल्या सात वर्षांपासून अपघातग्रस्तांची नि:शुल्क सेवा करत आहेत.

अरुंद पुल ठरतोय प्रवाशांसाठी काळ
जामकी शिवारातील बेलदारा फाट्याजवळ अरुंद पूल आहे. तेथे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, जवळच रेल्वेगेटही आहे. सतत वर्दळ असल्याने या रस्त्यावर एका वर्षात २०-२५ अपघात झाले असून, त्यात १६ जणांना प्राण गमावले लागले आहे. तसेच १२-१५ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. चौपदरीकरण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल.
संदीप गामित, पोलिस कॉन्स्टेबल

सामूहिक अंत्ययात्रा
शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर निमगूळ येथे शिंदखेडा व दोंडाईचा परिसरातील मृतांचे नातेवाईक व मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. यापूर्वीही निमगूळ येथील तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, सर्व मृतांची सामूहिक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी
झाले होते.
बातम्या आणखी आहेत...