आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Hundred Family Free Service To Trainee Doctor At Nashik

पाचशे कुटुंबांचे ‘आरोग्य’संवर्धन; शिकाऊ डॉक्टर देणार मोफत सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शहरातील 500 गरीब व गरजू कुटुंबांना प्राथमिक स्तरावर दत्तक घेतले आहे. या कुटुंबांना विद्यापीठाच्या शिकाऊ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत.

नाशिकमध्ये हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर राज्यात इतरत्र तो राबवण्यात येणार आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी या कुटुंबांना सेवा देतील. एका विद्यार्थ्याकडे (शिकाऊ डॉक्टर) पाच कुटुंबांची जबाबदारी देण्यात आली असून, ते या कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करतील. आठवड्यातून एकदा एका कुटुंबाला भेट देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. कुटुंबात विशिष्ट आजार असल्यास त्या शाखेचे शिकाऊ डॉक्टर त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात येतील.

अँडमिट करून घेण्याचीही सुविधा
एखाद्या रुग्णाला अधिक उपचारासाठी अँडमिट करण्याची आवश्यकता भासल्यास तीही सुविधा देण्यात येईल. आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना दाखल केले जाईल. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात येणार आहे.

सामाजिक बांधिलकीसाठी
सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यापीठाने हा उपक्रम सुरू केला आहे. नाशिकमध्ये त्यास सुरुवातही झाली असून, इतरत्र लवकरच तो सुरू केला जाणार आहे.
-डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

आज दीक्षांत सोहळा
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 12वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी (दि. 10) होत आहे. यंदा हा सोहळा विद्यापीठाच्या नव्या दीक्षांत सभागृहामध्ये होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन मंत्री डॉ. राजेंद्र गावित यांच्या हस्ते होईल. या समारंभात मागील वर्षी विविध शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला जाणार आहे.