आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार परदेशी नागरिकांचे नाशकात याेगशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अांतरराष्ट्रीय याेगदिनाचे यंदा दुसरे वर्ष असले तरी त्यापेक्षाही अाधी अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये येऊन याेग शिक्षण घेणाऱ्या विदेशी नागरिकांची संख्या पाच हजारहून अधिक अाहे. विशेष म्हणजे, त्यातील अनेक विदेशी नागरिक हे याेगप्रशिक्षण केवळ स्वत:पुरते नव्हे तर त्यांच्या देशात जाऊन याेग शिकवण्यासाठीही घेतात. अशा प्रकारचे याेग प्रशिक्षकाचे प्रशिक्षण घेतलेले हजाराहून अधिक विदेशी नागरिक विविध देशांमध्ये याेग प्रशिक्षण देत अाहेत.
नाशिक ही प्राचीन काळापासून ऋषीमुनींची तपाेभूमी अाहे. असेच याेग या विषयासाठी जीवन समर्पित केलेले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वासराव मंडलिक. त्यांनी गत तीन दशकांपासून नाशकात याेगशिक्षणाचे धडे देण्यास प्रारंभ केला. दशकभरापासून निसर्गरम्य वातावरणात नागरिकांना हे याेग शिक्षण देता यावे, म्हणून नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरीजवळ याेगकेंद्राची निर्मिती करण्यात अाली.

प्रत्येक महिन्यात विदेशी याेगप्रेमींना प्रशिक्षण
प्रत्येकमहिन्यात याेग प्रशिक्षणासाठी ३० विदेशी विद्यार्थ्यांची एक बॅच या केंद्रात दाखल हाेते. त्यात अगदी विशीतले तरुण - तरुणी असतात. तसेच साठी अाेलांडलेले ‘सीनिअर सिटीजन’ही. जगातील युराेप, अमेरिका, अाफ्रिका, अाॅस्ट्रेलिया अाणि अाशिया अशा पाचही खंडांमधील सुमारे ६० देशांतील नागरिक एकाचवेळी याेगाचे धडे गिरवत असतात.

याेगप्रेमी अाॅस्ट्रेलियन बनली मंडलिकांची सून
एकेकाळची केट वुडवर्थ नावाची अाॅस्ट्रेलियन तरुणी अाता नाशिकमध्ये राहून देश - विदेशातून येणाऱ्यांना याेग शिकवते, याेगावर वेगवेगळे संशाेधन करते. अाॅस्ट्रेलियात जन्मलेल्या अाणि सिडनीत वाढलेल्या केटला अाणि तिच्या कलाकार माता - पित्यांना पर्यटन करताना भारत अावडू लागला. त्यामुळे वर्षातून किमान एक - दाेन वेळा संपूर्ण वुडवर्थ कुटुंब भारतात येत हाेते. सन २००६ मध्ये या कुटुंबाने नाशकात याेग विद्या धाममध्ये येऊन याेग प्रशिक्षण घेतले. त्यात केटला याेगाबद्दल खूपच कुतूहल वाटल्याने अधिक शिकण्याची अभिलाषा निर्माण झाली. त्यामुळे तिने इथेच नाशकात राहून याेगाचे पुढील शिक्षण घेतले. त्यासाठी याेगाचार्य विश्वासराव अाणि पाैर्णिमा मंडलिक यांच्याच घरी ती राहू लागली. त्यात मग तिने याेगाचे अॅडव्हान्स, थेरपी असे पुढील अभ्यासक्रम करीत याेगावर संशाेधन करायला प्रारंभ केला. २०१० मध्ये मंडलिक यांचे स्नेही पुण्याचे भाऊ कुलकर्णी यांनी या मुलीला सून बनवून घेण्याचा सल्ला दिला अाणि केटची भक्तिरचना गंधार मंडलिक झाली. याेगाचा प्रसार व्हावा यासाठी ‘याेगा अॅन्ड थेरपी’, ‘अाश्रम रेसीपीज’ अाणि ‘प्री मॅटल याेगा’ ही तीन पुस्तके त्यांनी लिहिली अाहेत. अाता तिच केट अर्थात भक्तिरचना अाणि पती गंधार मंडलिक या केंद्रात येणाऱ्या शेकडाे विदेशी नागरिकांना याेगाचे प्रशिक्षण देत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...